पुणे : डे्रनेज चेंबरमध्ये वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह रविवारी सकाळी नऊच्या सुमारास कसबा पंपिंग स्टेशनजवळ सापडला. डे्रनेजलाइनमधून वाहत आलेला त्याचा मृतदेह पंपिंग स्टेशनजवळ असलेल्या जाळीमध्ये अडकला होता. हा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला होता. त्याचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. गणेश किशोर चांदणे (वय १४, रा. बिडकर वस्ती, अंबिल ओढा वसाहत, दांडेकर पूल) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश मनपाच्या शाळेमध्ये सातवीमध्ये शिकत होता. गणेशचे आईवडील मोलमजुरी करतात. अंबिल ओढ्यामध्ये असलेल्या मोकळ्या जागेत तो मित्रांसह खेळत असताना त्यांचा चेंडू नाल्याच्या दिशेने गेला. हा चेंडू काठीच्या साहाय्याने खेळत असताना तो पाय घसरून खाली पडला. पाण्याच्या प्रवाहासोबत तो चेंबरला पाडण्यात आलेल्या भगदाडामधून खाली पडला. मुलांनी आरडाओरडा करीत अग्निशामक दलाला याची माहिती दिली. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालामध्ये त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, दलित महासंघाच्या महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी खोदकाम करणारे ठेकेदार, मनपाचे संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्या आईला नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन अध्यक्षा लक्ष्मी पवार, वनिता डोलारे, कांताबाई कसबे, श्रीरंग भालेराव, रवि शिंदे, नीलेश ननावरे यांनी दत्तवाडी पोलिसांकडे दिले आहे.
गणेश चांदणेचा मृतदेह सापडला
By admin | Published: January 09, 2017 3:46 AM