पुणे: गणेशोत्सवाचे अवघे चार दिवस राहिले असताना रविवारच्या सुट्टीची संधी साधत पुणे शहर, जिल्ह्यासह विविध ठिकाणाहून आलेल्या उत्साही भाविकांनी शहरातील मध्य वस्तीतील रस्ते फुलेले असून या गदीर्ला रस्ते अपुरे पडल्याचे दिसून येत होते़ शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, नाना पेठ, भवानी पेठ भागात अनेक मंडळांनी वैविध्यपूर्ण देखावे केले आहेत. तर यंदा समाजप्रबोधन करणारे आणि शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जिवंत देखाव्याचे प्रमाण अधिक आहे. सकाळपासूनच शहराच्या मध्यवर्ती भागात देखावे, गणरायाच्या दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही पेठासहित उपनगरातून नागरिक अतिशय उत्साहाने मंडळांची आरास पाहण्यासाठी येत होते़ खेळणी, टोप्या, शोभेच्या वस्तू, खाद्यपदार्थ स्टॉल, चैनीच्या वस्तूंचे स्टॉल मोठया प्रमाणावर दिसून आले. या स्टॉलवर अनेक महिला, लहान मुले वस्तू खरेदी करताना दिसून येत होत्या. मंडई, बाबू गेनू यांचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी नागरिक तासनतास रांगेत उभे राहिले होते. सायंकाळी सहा नंतर जिवंत देखावे, पौराणिक देखावे, आणि विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले. जिवंत देखाव्यातून सामाजिक संदेश मिळत होता तर काही ठिकाणी शिवाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती मिळत होती. शिवाजी महाराजांचा देखावा पाहताना शिवाजी महाराज की जय असा जयघोष नागरिक करत होते. समाजप्रबोधन करणाºया देखाव्यांना नागरीकांकडून टाळ्यांचा प्रतिसाद मिळत होता. पौराणिक देखाव्यातही पाहण्यात लोकांचा आनंद दिसत होता. विद्युत रोषणाई करणाºया मंडळांसमोर नागरिक गाण्याचा आनंद लुटत होते. हिंदी आणि मराठी गाण्यांच्या तालावर चालणारी रंगबेरंगी एलईडी लाईट्स पाहून नागरिक नाचण्याचा आनंद लुटत होते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया चा घोष सर्वत्र ऐकू येत होता. रस्त्यावर पिपानीचे आवाज, लहान मुलांच्या हातातील फुगे यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पौराणिक देखावे पाहण्यासाठी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच उत्सुकतेने सहभागी झाले आहेत. प्रत्येक ठिकाणी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढणे, सेल्फी काढणे, फोटो काढणे याला जास्त प्राधान्य देण्यात आले. प्रमुख रस्त्यावरील कॅफे, हॉटेलमध्येही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. पेठांमध्ये बºयाच मंडळांनी आकर्षक महाल, मंदिरे उभारली आहेत. हे पाहण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. मधूनच येणारी पावसाची भुरभुरही या उत्साहाला रोखू शकत नव्हती़
गणेश महोत्सव 2019: उत्साही भाविकांना रस्ते पडले अपुरे ; आरास पाहण्यास प्रचंड गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 12:16 PM
सायंकाळी सहा नंतर जिवंत देखावे, पौराणिक देखावे, आणि विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले..
ठळक मुद्देसमाजप्रबोधन करणारे आणि शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जिवंत देखावे अधिक