पिंपरी : कला आणि कलावंतांविषयी जाण नसल्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमातही राजकारण घुसल्याने पंधरा वर्षांपूर्वी बंद केलेला पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टिव्हल या वर्षीपासून सुरू होणार आहे. ‘महाराष्ट्रीय लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर आर. एस. कुमार असताना १९९६ मध्ये पुणे फेस्टिव्हलाच्या धर्तीवर गणेश फेस्टिव्हला आयोजित केला होता. हा महोत्सव पिंपरी, निगडी, भोसरी अशा विविध परिसरांत झाला होता. लोककलांपासून शास्त्रीय, उपशास्त्रीय कलांचा आस्वाद शहरवासीयांना मिळत होता. या महोत्सवाचा लौकिक एवढा वाढला की पदाधिकाºयांमध्ये हा महोत्सव कोठे भरवायचा यावरून चढाओढ लागत असे. भारतरत्न भीमसेन जोशी यांच्यापासून प्रसिद्ध गायक अन्नू मल्लीक, उदीत नारायणन, साधना सरगम अशा विविध मान्यवर कलावंतांचा कलाविष्कार अनुभवयास मिळला होता.महोत्सवाच्या आयोजनावरून २००२ मध्ये राजकारण झाले होते. तत्कालीन महापौर प्रकाश रेवाळे यांनी हा महोत्सव बंद केला. त्यानंतर एक वर्षे पिंपरी-चिंचवड उत्सव सांस्कृतिक समितीच्या माध्यमातून महोत्सव सुरू केला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड सोशल क्लबच्या माध्यमातून लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे, उमा खापरे, प्रवीण तुपे यांच्यासह अन्य कलाप्रेमींनी एकत्र येऊन लोकसहभागातून महोत्सवाची परंपरा पुढे कायम ठेवली. २०१४ पर्यंत हा महोत्सव सुरू होता.आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेतही गणेश फेस्टिव्हला उपक्रमांवर चर्चा झाली. अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. या वेळी बंद पडलेला गणेश फेस्टिव्हला सुरू करावा, अशी मागणी सर्व सदस्यांनी केली. तसेच शहरातील विविध संस्थांनीही गणेश फेस्टिव्हला सुरू करावा, अशी मागणी यापूर्वी केली होती. महापौर काळजे यांनी शहरवासीयांच्या मागणीचा विचार करून फेस्टिव्हलाच्या आयोजनाचे नियोजन केले आहे.आविष्कार : शास्त्रीय संगीताचा कार्यक्रममहापौर म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहरातील कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, मान्यवर कलावंतांचा अविष्कार शहरातील रसिकांना पाहता यावा, यासाठी गणेश फेस्टीव्हल सुरू करण्यात येणार आहे. तीन ते पाच दिवसांचा महोत्सव असावा. तसेच शहरातील विविध भागांत हा महोत्सव व्हावा, असे नियोजन करण्यात येणार आहे. लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीताचे कार्यक्रमांचे नियोजन केले जाणार आहे.’’
यंदा गणेश फेस्टिव्हल - नितीन काळजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 2:44 AM