पुणे: तब्बल सहा वर्षांपूर्वी मुका झालेला गणेश कला क्रीडा मंदिरातील सिनेमाचा पडदा आता बोलू लागणार आहे. महापालिकेने पुढाकार घेऊन पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (पिफ) नव्या धर्तीचा डिजिटल सिनेमा पॅकेजिंग (डीसीपी) हा प्रोजेक्टर बसवून दिला. त्यामुळे आता गणेश कला क्रीडा मंदिर हे तब्बल अडीच हजार आसनक्षमता असलेले देशातील दुसरे चित्रपटगृह झाले आहे.
पिफ सुरू झाला, त्यावेळी महापालिकेने त्यांच्यासाठी गणेश कला क्रीडा मंदिरातच एक प्रोजेक्टर आणि पडदा बसवून दिला होता. शिवाय उत्तम दर्जाची ध्वनिक्षेपक यंत्रणाही महापालिकेने बसवून दिली. उदघाटनाच्या कार्यक्रमासह तिथेच महोत्सवातील बहुसंख्य चित्रपट दाखविले जात. मात्र, काही कालावधीनंतर ३५ एमएममध्ये चित्रपट तयार करणेच बंद झाले. त्यामुळे हा लहान प्रोजेक्टर बिनकामाचा तिथेच राहिला. वापरच नसल्याने पडदा वर खाली करणारी रिमोट यंत्रणाही काही दिवसांनी नादुरुस्त झाली. त्यानंतर महोत्सवातील चित्रपट शहरातील अन्य चित्रपटगृहात दाखविण्यास सुरुवात झाली व तीच पुढे कायम राहिली.
गणेश कला क्रीडा मंदिरात चित्रपट पाहताना जी मजा येत होती, ती काही अन्य चित्रपटगृहांमध्ये येत नव्हती. अलीकडे कोणी महोत्सवाला चित्रपटगृह द्यायलाही तयार नव्हते. त्यामुळेही संयोजकांची अडचण होत होती. त्यातूनच मग चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी शहरातील नाट्यगृहांमध्ये चित्रपट दाखवा, असे आवाहन केले. पिफचे सहसंचालक विशाल शिंदे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याबरोबर बोलताना गणेश कला क्रीडा मंदिराची गोष्ट त्यांच्या नजरेस आणली व खंत व्यक्त केली.
त्यानंतर विक्रम कुमार यांनी सर्व सुत्रे हलविली. महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या उपायुक्त चेतना केरूरे व विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता मनीषा शेकटकर यांना त्यांनी सूचना केल्या. त्यानुसार त्यांनी काम सुरू केले. प्रथम त्यांनी अत्याधुनिक असा नवा डीसीपी मिळविला. तो गणेश कला क्रीडामध्ये योग्य जागेवर बसविला. त्यानंतर पडदा वर खाली करणारी यंत्रणा, त्याचा रिमोट दुरुस्त करून घेतला. संपूर्ण पडदा स्वच्छ केला. या संपूर्ण यंत्रणेची त्यांनी चाचणी घेतली. ज्यावेळी पडद्यावर चित्रपट सुरू झाला त्यावेळी त्यांनी पिफच्या पदाधिकाऱ्यांना बोलावले व दाखविले.
पडदा बोलत होता व आमचे शब्द मुके झाले होते, असे विशाल शिंदे यांनी याबाबत बोलताना सांगितले. महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनीही आनंद व्यक्त केला. महापालिकेने हे केल्यामुळे आता पडदा खाली घेतला की तिथे आम्हालाच नाही तर कोणालाही चित्रपट, माहितीपट दाखविता येतील. यातून आता गणेश कला क्रीडा हे सर्वाधिक आसन क्षमता असलेले देशातील दुसऱ्या क्रमाकांचे चित्रपटगृह झाले आहे, असे ते म्हणाले.