धनकवडी : धनकवडी मधील जयनाथ मित्र मंडळाने सामाजिक संघटनांच्या मदतीने भोर तालुक्यातील आशिंपी, उंबर्डे, वाडी, कुंड या गावांना मदत केली आहे. या गावांना जाण्यासाठी रस्ताही नव्हता. तसेच तालुक्याशी त्यांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे जवळपास १८ किलोमीटर पायपीट करत, अवघड रस्त्यातून वाट काढत डोक्यावर धान्य आणि औषधांची किट त्या भागात पोहोचवली आहेत.
नैसर्गिक आपत्ती आणि कठीण प्रसंगामध्ये मिळणारी मुठभर धान्याची मदत जगण्याची नवी उमेद देते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये उभा महाराष्ट्र धावून जातो हि महाराष्ट्राची संस्कृती आणि संतांची शिकवण आहे. त्यामुळे कितीही मोठे संकट आले तरी हि दु:खाचा डोंगर कोसळलेल्या पूरग्रस्त भागातील मंडळींना आधार मिळतो असे मत नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे यांनी व्यक्त केले.
यावेळी जय नाथ मित्र मंडळाचे शंभर कार्यकर्ते सोबत होते. यावेळी भोर मेडिकल स्टोअर संघटनेच्या वतीने धीरज जेधे यांनी औषध किट दिले. सह्याद्री रेस्क्यू टीमच्या मार्गदर्शन व मदतीने ही मदत पोचविण्यात आली. या मदतकार्यासाठी पोलीसही सहभागी झाले होते.