पुणे : गणेश मंडळांना विविध परवानग्या देण्याचे काम येत्या सोमवार पासून सुरू करण्यात येणार असून, यासाठी महापालिकेत एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाने घालून दिलेले निर्बंध पाळून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी केले.गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी शुक्रवारी महापौरांच्या अध्यक्षतेखाली गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, आयुक्त सौरभ राव, वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शहर सुधार समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे, अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप, नगरसेवक दिलीप वेडे पाटील, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, अण्णा थोरात यांच्यासह शहरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. माधव जगताप यांनी उच्च न्यायालयाच्या नियमांची माहिती दिली.
गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी येणाºया अडचणी व समस्या कथन करताना, जे काम शासनाला जमले नाही, ते काम पुण्यातील गणेश मंडळांनी केली आहेत. या काळात हजारो रुपयांची उलाढाल होते, याचा विचार करून नियमांकडे दुर्लक्ष करावे. यात मांडवाची नियमावली शिथील करावी. मेट्रोच्या कामामुळे जेथे अडचण आहे, तेथील मंडळांशी प्रशासनाने आतापासूनच संवाद साधावा. वस्तुस्थितीनुसार नियम लावले जावेत. पोलिस खात्याने समन्वय साधावा, गणेशोत्सव काळात स्वच्छता गृहाची व्यवस्था करावी, गणेशमूर्ती हौदामध्ये विसर्जित केल्यानंतर पुढील व्यवस्था योग्य पद्धतीने करावी, अशा विविध मागण्या केल्या. कोरेगाव पार्क परिसरात रात्रभर पब आणि बार चालतात, त्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाकडे पोलिस दुर्लक्ष करतात, मात्र गणपती उत्सवातीलच ध्वनी प्रदूषण पोलिसांना दिसते, असा प्रश्नही उपस्थित केला.
टिळक म्हणाल्या, मंडळांना विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजनेसाठी सर्व माहिती असणारा नोडल आॅफिसर नेमण्यात येणार आहे. वाहतूककोंडी झाली तर मंडळालाच त्रास होणार आहे. रस्त्यांची वस्तुस्थिती पाहून नियमावली लावणे गरजेचे आहे. सरसकट नियमावली लावता येणार नाही. जेथे अडचणी येतील तेथे समन्वय साधून प्रश्न सोडवता येतील. कोणत्याही मंडळाने अनधिकृत वीजजोड करू नये. या काळात मेट्रोचे बॅरिकेड कमी करावेत, म्हणजे कोंडी होणार नाही. तसेच १ सप्टेंबरला गणेश मंडळांचे पारितोषिक वितरण केले जाणार आहे. पोलिस उपायुक्त सातपुते म्हणाल्या, पोलिसांकडून कोणताही त्रास दिला जाणार नाही. समन्वय राखण्यासाठी लवचिकता ठेवणे गरजेचे आहे. मंडळाचे स्वयंसेवक वाहतूक पोलिसांना मदत करतील, अशी अपेक्षा आहे.गणेशोत्सवात मेट्रोचे काम बंद ठेवासध्या शहरामध्ये मेट्रोचे काम जोमात सुरु आहे. परंतु यामध्ये संपूर्ण कर्वे रोड व अन्य परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होते. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवामध्ये मेट्रोच्या प्रकल्पाचे काम दहा दिवस बंद ठेवावे आणि लावलेले बॅरिकेड आत घ्यावेत, म्हणजे वाहतूककोंडी होणार नाही. दहा दिवस काम बंद ठेवल्याने आकाश कोसळणार नाही, अशी मागणी अखिल मंडई गणेश मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी केली.