पुणे: पुण्यात सर्वत्र कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होऊ लागल्याने त्यांना बेडची गरज भासू लागली आहे. पण बेड मिळवण्यासाठी तारांबळ उडत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक रुग्णालयातून तर वेटिंगचा बोर्ड दाखवला जात आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजन पातळीचा सामना करण्यासाठी ऑक्सिजन बँकचा आधार देणारी नवी कल्पना धनकवडीतील एका मंडळाने शोधून काढली आहे.
रुग्णाची ऑक्सिजन पातळी ८५ च्या पूढे असेल. त्याला बेड मिळण्यास अडचणी येत असल्यास ही बँक मदत करू शकते. त्याद्वारे चार तासापार्यंत रुग्ण श्वास घेऊ शकतो. अशा ऑक्सिजन बँक ना नफा ना तोटा या तत्वावर नागरिकांना देण्यात येत आहेत. तर गरजूना मोफत देण्याचे काम मंडळाकडून सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती अखिल मोहननगर मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष मयूर बुरसे यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. मंडळाच्या एका कार्यकर्त्याला बेड न मिळाल्याने जीव गमवावा लागला. त्याची ऑक्सिजन पातळी उतरली होती. मंडळाच्या सदस्यांनी खूप प्रयत्न करूनही बेड मिळणे कठीण झाले होते. अनेक रुग्णालयात ते शोधण्यात वेळ गेला. त्या वेळात श्वासोच्छ्वासात खूप अडचणी आल्याने त्याने प्राण सोडला. इतर रुग्णांना अशा समस्येला तोंड देताना अडचणी येऊ नये. म्हणून ऑक्सिजन बँकच्या या उपक्रमाला सुरुवात केली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
एका ऑक्सिजन बँकमधून रुग्ण २५० वेळा ऑक्सिजन घेऊ शकतो. ती तब्बल चार तास चालते. मंडळाचे सर्व कार्यकर्ते या कामात गुंतले आहेत. गरजू लोकांना हा फ्री दिला जातो. तर ज्यांना आर्थिक अडचण नसेल. त्यांना ना नफा ना तोटा या किंमतीत विकत देण्यात येत आहे.
बुरसे म्हणाले, सद्यस्थितीत लोक ऑक्सिजनच्या बेडसाठी झगडत आहेत. त्यांना दिवसभर बेड मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. ऑक्सिजन बँकमुळे थोडाफार आराम मिळत असल्याचे रूग्णांनी सांगितले आहे. आम्ही आतापर्यंत २०० ते २५० नागरिकांना हे दिले आहे. या बँकच्या वापरामुळे ऑक्सिजन पातळी त्वरित वाढते. त्यामुळे रुग्णाची भीतीही निघून जाते. शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होणाऱ्या परिस्थितीतून स्वतःला सावरण्यास मदत होते.