पुणे: गणेशोत्सवावरील निर्बंध दूर झाल्याने यंदा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने शहर पोलिसांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांबरोबर बुधवारी बैठक घेऊन आचारसंहिता निश्चित केली आहे. त्यानुसार गणेश मंडळांना जास्तीत जास्त दोन बॉक्स कमानी उभारता येणार आहेत. तसेच या बॉक्स कमानींची उंची २० फुटांपेक्षा जास्त नसावी. या कमानी गणेश मंडळाच्या १०० फुटांच्या आत असाव्यात असे बंधन घालण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, रामनाथ पोकळे, जालिंदर सुपेकर, नामदेव चव्हाण, सर्व पोलीस उपायुक्त, तसेच सुनील रासने, महेश सूर्यवंशी, प्रसाद कुलकर्णी, प्रवीण परदेशी, विकास पवार, नितीन पंडित, पुनीत बालन, धीरज घाटे, भाऊ करपे, प्रमोद कोंढरे, सुनील पांडे, ॠग्वेद निडगुडकर, विश्वास भोर, बाळासाहेब मारणे, भूषण पंड्या, आदी उपस्थित होते.
गणेश मंडळांचा सर्व आर्थिक भार सध्या जाहिरातीच्या उत्पन्नातून चालविला जातो. कोरोनामुळे गेले दोन वर्षे मंडपातच उत्सव साजरा करण्यात आल्याने मंडळांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. लोकवर्गणीवरही मर्यादा असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे बॉक्स कमानीवर बंधन आणू नये. जेथे दोन मंडळे जवळ जवळ आहेत, त्या ठिकाणी मर्यादा आवश्यक आहे; पण अन्य ठिकाणी अशी मर्यादा आणू नये, अशी विनंती करण्यात आली. त्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संबंधित विभागाचे पोलीस उपायुक्त प्रत्यक्ष मंडळाच्या ठिकाणची परिस्थिती पाहून निर्णय घेतील, असे सांगितले.
असे असतील बंधन
- पोलीस परवानासाठी एक खिडकी योजना- रस्त्याचा १/३ भागच मंडपासाठी वापरावा- ध्वनिक्षेपकाचा वापर सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या अटीनुसार करावा- ध्वनिक्षेपकाची मर्यादा २ ओहम व ५ हजार आरएमएस वॅट पेक्षा जास्त असू नये- गणेश मूर्ती, सजावटीची देखभाल करण्याकरिता मंडळाचे कमीत कमी पाच कार्यकर्ते अथवा खासगी सुरक्षारक्षक २४ तास मंडपात नेमावेत- - महत्त्वाच्या व गर्दी खेचणाऱ्या गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व त्यांचे रेकॉर्डिंग करावे- मंडपामध्ये अथवा इतरत्र अनोळखी संशयित, बेवारस वस्तू (उदा. सुटकेस, रेडिओ, मोठे घड्याळ, जेवणाचे डबे, सायकली वगैरे) आढळून आल्यास किंवा कोणी रेंगाळताना दिसल्यास ताबडतोब पोलिसांना कळवा
ध्वनिक्षेपकावरील निर्बंध या दिवशी हाेतील शिथिल
पाचवा दिवस ४ सप्टेंबर -गौरीपूजनसातवा दिवस ६ सप्टेंबर - गौरी विसर्जननववा दिवस ८ सप्टेंबरअनंत चतुर्दशी ९ सप्टेंबर