लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आजपर्यंत गणेशोत्सवादरम्यान पोलिसांनी गणेश मंडळांना ज्या काही सूचना केल्या आहेत, त्यांची अंमलबजावणी मंडळांनी केली आहे. तरीही, गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करणार, त्यांच्यावर कारवाई करणार, अशी भाषा पोलिसांकडून वापरली जाणार असेल आणि मंडळांना ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावरून नोटिसा पाठविल्या जाणार असतील, तर ते अत्यंत चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. हा उत्सव बंद करायचाय का? असा संतप्त प्रश्न उपस्थित करीत मानाची सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पोलिसांच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याच्या पवित्र्यात आहेत.शहर पोलिसांनी मानाच्या गणपतींसह अन्य ३५ मंडळांवर नोटिसा बजावून त्यांच्यावर कारवाई करण्याचे सूतोवाच केल्याने मंडळांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पोलीस मंडळांकडून कायदा-सुव्यवस्थेचे पालन करण्याकरिता शिस्तबद्धतेची अपेक्षा करतात, तशीच कृती पोलिसांकडून होणे अपेक्षित आहे. मात्र, दिवसेंदिवस पोलिसांकडून मंडळांवर जाचक अटी लादल्या जात आहेत. दर वर्षी पोलिसांबरोबर गणेश मंडळांच्या बैठका होतात. त्यात अनेक सूचना मंडळांसमोर मांडल्या जातात. उदा.- मिरवणुकीत टोल वाजवणे बंद करावे, ढोलांची संख्या निश्चित करावी, मिरवणूक वेळेत संपवावी या सूचनांचे मंडळांनी स्वागतच केले आहे. मात्र, तरीही ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावरून नोटिसा पाठविल्या जाणार असतील, तर आम्हालापण विचार करावा लागेल. ढोल, बँड आणि स्पीकर गणेशोत्सव मिरवणुकीत नसतील, तर काय अंत्ययात्रा काढतोय का आम्ही? असा संतप्त सवालही मंडळांनी केला आहे. पोलिसांची हीच भूमिका असेल, तर यापुढे बैठकीला जायचे की नाही याचा आम्ही विचार करू, असा पवित्रा मंडळांनी घेतला आहे.
गणेश मंडळे पोलिसांविरोधात बहिष्काराच्या पवित्र्यात
By admin | Published: June 22, 2017 7:02 AM