जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि अन्य प्रकारचे प्रदूषण कमी करण्यासाठी परिसरातील सर्व गणेश मंडळांनी तसेच नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा तसेच गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्व मंडळांनी स्वयंशिस्तीचे पालन करावे, असे आवाहन महाळुंगे पोलीस चौकीचे उपनिरीक्षक महेश चिटमपल्ली यांच्याकडून करण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सार्वजनिक गणेशोत्सव सण हा साध्या पद्धतीने साजरा करून ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविण्याच्या सूचना महाळुंगे पोलिसांनी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिल्या.
महाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे सदस्य व ग्रामस्थांच्या समवेत महाळुंगे येथील अस्मिता भवनमध्ये बैठक घेण्यात आली.
यावेळी पोलिसांनी महाराष्ट्र शासन व पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ बाबत दिलेल्या सूचनांची माहिती दिली. अनंत चतुर्दशीदिवशी महाळुंगे ग्रामपंचायतीमार्फत, महाळुंगे गावातील सर्व मूर्ती एकत्र करून विसर्जनस्थळी नेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. यावेळी ग्रामपंचायतीकडून मूर्ती दान हा उपक्रम राबवण्यात येणार आहे, तसेच गावात गाडी फिरवून गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी जमा करणार आहे.
बैठकीसाठी महाळुंगे ग्रामपंचायत, गावातील ग्रामस्थ व विविध मंडळांचे कार्यकर्ते, पोलीस पाटील, महाळुंगे पोलीस चौकीचे उपनिरीक्षक महेश चिटमपल्ले उपस्थित होते. बैठकीदरम्यान सर्व ग्रामस्थांना व गणेश मंडळांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. गर्दी होईल असे गणेश उत्सव काळात कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम, अन्नदान, महाप्रसाद इ. कार्यक्रमांना परवानगी नाही. कृपया कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सूचनांचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे. जे गणेश मंडळ शासन आदेशांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलिसांनी केले.
महाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे सदस्य व ग्रामस्थांच्या समवेत महाळुंगे येथील अस्मिता भवनमध्ये बैठक घेण्यात आली.