गणेशमंडळांनी अधिकृत वीजजोड घ्यावी ; महावितरणचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 10:23 AM2019-08-28T10:23:59+5:302019-08-28T10:25:02+5:30
सार्वजनिक गणेशोत्सवात हजारोंच्या संख्येने भाविकमंडळी श्रीगणेशांच्या दर्शनाला व विविध ठिकाणी देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी तेथील वीजवहन यंत्रणा दर्जेदार हवी.
पुणे : वीज दिसत नसली तरी तिचे भयंकर जीवघेणे परिणाम होवू शकतात. त्यामुळे अगामी गणेशोत्सवात गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी. पथ दिव्यांवरुन, मंडळाच्या कार्यकर्त्याच्या घरातून अथवा थेट विद्युत वाहिनीवर आकडे टाकून वीज घेऊ नये, असे आवाहन महावितरणच्या वतीने केले आहे.
सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट प्रतियुनिट ३ रुपये २७ पैसे अधिक १ रुपया २८ पैसे वहन (व्हिलींग) आकार असे ४ रुपये ५५ पैसे वीजदर आहेत. तसेच कितीही वीज वापरल्यास शेवटच्या युनिटपर्यंत याच दराने पैसे आकारणार आहेत. घरगुती दरांपेक्षाही विद्युत दर कमी असल्याने अधिकृत विद्युत जोड घेऊन अपघात टाळावे, असे महावितरणच्या अधिकाºयांना सांगितले.
सार्वजनिक गणेशोत्सवात हजारोंच्या संख्येने भाविकमंडळी श्रीगणेशांच्या दर्शनाला व विविध ठिकाणी देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी तेथील वीजवहन यंत्रणा दर्जेदार हवी. गणेशोत्सवातील मंडप, रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी विद्युत संचमांडणी ही परवानाधारक कंत्राटदारांकडून करून घेतली पाहिजे. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर चाचणी अहवाल देखील घेतला पाहिजे. इलेक्ट्रिक मीटर व इतर स्विचगिअर्स लावलेली जागा देखभालीसाठी मोकळी ठेवावी. तसेच मीटर व स्विचगिअर्सवर पाणी गळणार नाही याचीही दक्षता घेतली जावी.
महावितरणकडून मंजूर केलेल्या विद्युतभारानुसार जोडभार संचमांडणीत जोडणे आवश्यक आहे. विद्युतभार सोसूशकतील अशी वायरींग असावी. संचमांडणीत दोन स्वतंत्र अर्थिंगची जोडणी केली पाहिजे. जनित्र वापरत असल्यास बॉडी व न्यूट्रलसाठी स्वतंत्र अर्थिंग जोडणे आवश्यक आहे. यासोबतच मीटर, स्विचगिअर्स, विद्युत उपकरणांजवळ धोक्याची सूचना देणारा फलक लावला पाहिजे.
मंडपासाठी पत्रे-टिनांचा वापर होत असल्याने वायर्स लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेल्या पण टेपने जोडल्या असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह वीज अपघाताची शक्यता असते. संचमांडणीत कुठेही वायर्स प्लगमध्ये खोचू नयेत, पंखे, फ्लड लाईट्सची जोडणी ही थ्रीपीनने करावी, हॅलोजन, फ्लड लाईटस किंवा जोड असलेल्या वायर्सजवळ सिल्क कपडा, मंडप किंवा इतर ज्वालाग्राही पदार्थ ठेऊ नयेत. वीजपुरवठा करणारी वायर लोखंडी ग्रील, अल्यूमिनियम, स्टील आदींच्या संपर्कात येणार नाही याचीही काळजी घ्यावी.