पुणे : शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या गणेशोत्सवाला मोठा इतिहास असून, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. १८५७च्या उठावानंतर स्वातंत्र्यसमर चिरडून टाकण्याचे काम इंग्रजांनी केले. जनमानसातील विजिगिषू वृत्ती संपुष्टात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले. स्वातंत्र्य आता इंग्रजांच्या दयेने मिळेल, असे वाटत असतानाच टिळकांनी स्वराज्याचा नारा देऊन खंडित समाजाला एकत्र आणण्यासाठी घरातल्या गणेशाला रस्त्यावर आणून विधायक स्वरूप दिले, हा धार्मिक नव्हे तर सामाजिक उत्सव आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक गणेशोत्सवातील टिळकांचे महत्त्व अधोरेखित केले.पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार संजय काकडे, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांच्यासह महापालिकेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.भारतीय समाजाला उत्साहात कार्यात सहभागी करून घ्यायचे असेल, तर उत्सव सुरू करावा लागेल, असा विचार टिळकांच्या मनात जागृत झाल्याने त्यांनी घरच्या गणपतीला रस्त्यावर आणून सार्वजनिक अधिष्ठान दिले, त्यामुळे खºया अर्थाने सामाजिक अभिसरण झाले. समाजाचे संघटन करण्याचे काम या उत्सवाने केले, असे सांगून फडणवीस म्हणाले की, हा १२५ वर्षांचा उत्सव कसा साजरा करायचा, हा आता खरा प्रश्न आहे. देश २०२२ मध्ये अमृतमहोत्सवीवर्षात पदार्पण करीत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२पर्यंत आधुनिक भारत घडविण्याचा नारा दिला आहे. जे पुण्यात पिकते ते जगभरात विकते, असे म्हणतात. त्यामुळे गणेशमंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवात ‘भारत कसा असेल’ या संकल्पनेवर आधारित देखावे सादर करावेत. टिळकांनी गणेशोत्सवात स्वराज्याचा मंत्र दिला, त्याचा उपयोग स्वराज्यासाठी करण्याचे आवाहन त्यांनी केले.गिरीश बापट यांनी भाषणात सार्वजनिक गणेशोत्सवातील टिळकांच्या योगदानाबरोबरच भाऊसाहेब रंगारी यांच्या नावाचाही आवर्जून उल्लेख केला. पुण्यात स्पर्धा, वाद हे सुरूच असतात, त्याशिवाय आम्हाला करमत नाही. हे चालतच असते, असे सांगून मंडळांना कानपिचक्या दिल्या.मुक्ता टिळक यांनी प्रास्ताविक केले. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर मोहोळ यांनी आभार मानले.या वेळी गणेशोत्सवाचे शुभंकर मोबाईल अॅप आणि संकेतस्थळाचे उद्घाटन झाले़ तसेच, उद्घाटन सोहळ्यानंतर अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’ हा कार्यक्रम झाला.सामाजिक बांधिलकी जपू : महापौरलोकमान्य टिळक, खासगीवाले, बिनीवाले, पाटणकर, भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. एक राजकीय विचार घेऊन टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक चळवळीचे स्वरूप दिले. तरीही टिळकांसह सार्वजनिक गणेशोत्सवात एकत्रित आलेल्यांचे योगदानही नाकारता येत नाही. त्यामुळे शतकोत्तर रौप्यमहोत्सवातील टिळक आणि शिवराय या वादाला मी पूर्णविराम दिला आहे, अशी जाहीर स्पष्टोक्ती करून महापौर मुक्ता टिळक यांनी सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपू, असे आवाहन भाऊसाहेब रंगारी मंडळाला केले.कायदा पाळा,पण प्रेमानेमुख्यमंत्र्यांचा पोलीस आयुक्तांना सूचक सल्ला. कायदा पाळा, पण जरा प्रेमाने. कारण, हा एक सांस्कृतिक उत्सव आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना सूचक सल्ला दिला; मात्र मंडळांना काहीही करण्याची परवानगी नाही, अशी समजही त्यांनी मंडळांना दिली.
लोकमान्यांकडूनच गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 4:07 AM