पुणे : ‘‘चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे, फिर भी कभी अब नाम को तेरे, आवाज मै ना दूँगा...’ हे गाणं असणारा ‘दोस्ती’ हा चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता. त्यामध्ये अंध व दिव्यांग असे दोन मित्र होते. त्यांची मैत्री यात दाखविली होती. अगदी तसेच स्टोरी दोन बिबट्यांची आहे. गणेश आणि विठ्ठल असे त्या दोन बिबट्यांची नावे असून, ते माणिकडोह बिबट निवारा केंद्रात एकमेकांची काळजी घेत आनंदमयी जीवन जगत आहेत. त्यांची ही यारी, दोघांनाही अत्यंत प्यारी आहे.
जुन्नर परिसरातील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात ही दोस्तांची जोडी पाहायला मिळत आहे. त्यातील १३ वर्षांच्या गणेशला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, तर विठ्ठल एका पायाने दिव्यांग आहे. दोघांना एकाच पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात येते. जेणेकरून दोघेही एकमेकांच्या सोबतीने जीवन जगतील. दोघांची मैत्री त्यांच्याकडे पाहिले की, अतूट असल्याचे दिसून येते.
गणेश हा पिंजऱ्यातील ओंडक्यावर, मचाणावर अतिशय लीलया वावरतो. कुठेही धडक देत नाही. दोन्ही डोळ्यांनी दिसत नसले तरी त्याला आता पिंजऱ्यातील सर्व ठिकाणं माहित झालेली आहेत. त्याची दृष्टी जाऊन दहा वर्षे झाली. नाक आणि कान या दोन्ही अवयवांनी तो वावरत आहे. अवयव सजग ठेवून तो रुबाबात वावरतो. दृष्टी नसली तरी जगण्याची, शिकण्याची जिद्द असल्याने त्याचे आयुष्य सोपं झालं आहे. हा गणेश म्हणजे १३ वर्षांचा बिबट आहे.
दोघेही घेतात एकमेकांची काळजी
गणेशचा दोस्ताचे नाव विठ्ठल आहे. दोघेही एका पिंजऱ्यात राहतात. त्यांच्यात चांगली गट्टी आहे. विठ्ठल हादेखील जखमी अवस्थेत केंद्रात आणला होता. तो एका ट्रॅपमध्ये अडकल्याने त्याच्या मागील एका पायाचा पंजाच निकामी झालेला. त्यामुळे तो पंजा कापावा लागला. कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात सोडता येत नाही, म्हणून माणिकडोह बिबट निवारा केंद्रात वन विभाग आणि वाइल्डलाइफ एसओएसचे कर्मचारी बिबट्यांचे संगोपन करत आहेत. दोघेही एकमेकांची काळजी घेत असल्याचे दिसते.