निरगुडसर : आंबेगाव विधानसभा मतदार संघात गणेशोत्सवानिमित्त ‘उत्सव गणेशाचा- जागर मताधिकाराचा’ या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार रमा जोशी यांनी दिली.
मा. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडून यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त ‘ उत्सव गणेशाचा- जागर मताधिकाराचा’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सध्या सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नागरिकांनी मतदार यादीमध्ये त्यांचे नाव नोंदविणे किंवा मतदार यादीमधील त्यांच्या नोंदणीमध्ये दुरुस्ती असल्यास ती करून घेणे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे हा या उपक्रमाचा हेतू असल्याची माहिती आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी सारंग कोडलकर यांनी दिली.
उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा या उपक्रमांतर्गत मतदार नोंदणी वाढविने, मतदानाचे महत्त्व, नैतिक मतदान या विषयांवर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मार्फत मंडपाच्या ठिकाणी मतदार यादीमध्ये नावनोंदणी करण्याविषयी जनजागृती करणारे बॅनर लावणे, मताधिकार जागृतीविषयाचे व्हिडिओ क्लिप्स, ऑडिओ क्लिप, घोषवाक्ये स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, कविता गायन स्पर्धा, पोस्टर स्पर्धा,पुणेरी पाट्या, व्यंगचित्र,स्थिर देखावे इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
‘उत्सव गणेशाचा- जागर मताधिकाराचा’ या उपक्रमामध्ये निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील स्वराज्य गणेश मंडळाच्या वतीने मंडपाच्या ठिकाणी बॅनर लावून व रांगोळीच्या माध्यमातून मतदार जनजागृती करुन स्पर्धेत सहभाग नोंदविला. निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील श्रीराम गणेश मंडळ, कमलजामाता गणेश मंडळ , विठ्ठल-रुक्मिणी मंदिर गणेश मंडळ,श्रीराम गणेश मंडळ रामवाडी, श्री साई गणेश मंडळ नांदूर, सार्वजनिक गणेश मंडळ खेडकरमळा अवसरी खुर्द,पिंपळगाव,घोडेगाव,मंचर येथील गणेश मंडळांनी बॅनर लावून मतदार जनजागृती स्पर्धेत सहभाग नोंदविला.
यावेळी उपस्थित नवमतदार व नागरिकांना मतदार नोंदणी व मतदानाचे महत्त्व याविषयी आंबेगाव स्विप पथकाचे प्रमुख सुनील भेके व नारायण गोरे यांनी मार्गदर्शन केले. सचिन तोडकर, विजय घिसे, मंगेश जावळे,विनायक राऊत, काशिनाथ घोंगडे, अभिजित नाटे, राहुल रहाटाडे,सोपान सैद,संतोष पोखरकर, अशोक लोखंडे,सावकार अरगड़े, संदीप बोंबले,सुरेश रोंगटे,मंडल अधिकारी दिपक मडके सर्व तलाठी,कोतवाल यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.या स्पर्धेत विजेत्या तीन मंडळांचा राष्ट्रीय मतदारदिनी २५ जानेवारी २०२२ रोजी गौरव करण्यात येणार असल्याची माहिती नायब तहसीलदार लतादेवी वाजे यांनी दिली.