पुणे : पुण्यात सर्वत्र गणरायाच्या आगमनाची तयारी जोरात सुरू आहे. त्यानुसार पोलीस प्रशासनदेखील कामाला लागले आहे. पुण्याच्या काही भागांतून मेट्रोचा ओव्हर ब्रीज गेला असल्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी मंडळांच्या देखाव्यांच्या उंचीला मर्यादा आल्या आहेत.
खंडुजीबाबा चौक येथे लकडी पुलावर नव्याने निर्माण झालेल्या मेट्रो ब्रीजची उंची २१ फूट आहे. त्यामुळे संभाजी पूल (लकडी पुलावरून) येणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी त्यांच्या विसर्जन रथाची देखाव्यासह उंची १८ फूट ठेवावी. कर्वे रोडवरील गरवारे मेट्रो स्टेशनची उंची १८ फूट आहे, तसेच नळस्टॉप येथील मेट्रो ब्रीजची उंची १७ फूट आहे. यासोबत कर्वे रोड ओव्हर ब्रीजलगतच्या दोन्ही सर्व्हिस रोडची रुंदी ही १५ फूट असल्याने कर्वे रोड मार्गे मुख्य विसर्जन मिरवणुकीमध्ये समाविष्ट होणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी त्यांच्या विसर्जन रथाची देखाव्यासह उंची १६ फूट ठेवावी आणि रुंदी १२ फूट ठेवावी, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.