पुणे : गणेशखिंड उद्यान पुणे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे झोनल कृषी संशोधन केंद्र असून येथील ३३.०१ हेक्टर क्षेत्र जैवविविधता वारसास्थळ (बायोडायव्हर्सिटी हेरिटेज) म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. मुंबईत आज (दि.२१) झालेल्या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला आहे. चेन्नई येथील राष्ट्रीय जैवविविधता मंडळाकडून वारसा स्थळे घोषित करण्याबाबत राज्यांना मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. यापूर्वी राज्यात ग्लोरी आॅफ आल्लापल्ली, गडचिरोली हे पहिले २०१४ मध्ये वारसा स्थळ घोषित झालेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेनंतर आता गणेशखिंड उद्यान व लांडोरखोरी, जळगाव हे नवीन वारसा स्थळे म्हणून घोषित होतील. ब्रिटिशांच्या कारकीर्दीत गव्हर्नर जनरल सर जॉन माल्कम यांनी हे उद्यान विकसित केले. काही वर्षांनंतर जॉर्ज मार्शल वूड्रो यांनी १८७३ मध्ये या बोटॅनिकल गार्डनची जबाबदारी स्वीकारली. पुढे राहुरी कृषी विद्यापीठाने या उद्यानाला स्वत:च्या कार्यक्षेत्रात सामावून घेतले आणि त्या पेशवेकालीन आंब्याच्या बागेचे आणि जुन्या झाडांचे संवर्धन केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मागील बाजूस असलेले हे संशोधन केंद्र सध्या १४५ एकरमध्ये विस्तारले आहे.
बागेत १६५ प्रकारची झाडे अन् औषधी वनस्पती गणेशखिंड फळ संशोधन केंद्राच्या पेशवेकालीन आंब्याच्या बागेतील आंब्याची जात हा इतरत्र न आढळणारा जनुकीय ठेवा आहे. पेशव्यांनी ही बाग तयार केलेली. याशिवाय, या बागेत १६५ प्रकारची जंगलात आढळणारी झाडे आहेत. यातील ४८ वनस्पती औषधी आहेत. दुर्मिळ प्रकारातील बुरशी, सूक्ष्म जीवांच्याही नोंदी आहेत.
शंभरी पार केलेले अनेक वृक्ष गणेशखिंड उद्यानात पिकांच्या ४९ जाती ,फळांच्या २३ जाती उपलब्ध आहेत.या उद्यानात ३५ विविध क्षेत्र असून तेथे विविध वृक्ष व फळझाडे आहेत.या पैकी काही वृक्ष हे १०० वर्ष जुने आहेत. गणेशखिंड पुणे या केंद्राने विविध पिके व फळे यांच्या नवीन १९ जाती विकसित केल्या आहेत.
========काही वर्षांपुर्वी गणेशखिंड उद्यानाचा प्रस्ताव पाठविला होता. त्याला मान्यता दिल्याने ही गौरवास्पद बाब आहे. अनेक वर्षांपासून उद्यानाला हेरिटेज दर्जा मिळवा म्हणून प्रतीक्षा केली जात होती. ज्या ठिकाणी जैवविविधता आहे, तेथील स्थानिकांनी असे प्रस्ताव पाठविल्यास ते हेरिटेज होऊ शकतात. - विलास बर्डेकर, अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ