पुणे : यंदाचा गणेशोत्सव ‘पर्यावरण उत्सव’ करण्यासाठी शहरात विविध उपक्रम राबवण्याचा निर्णय पर्यावरण संवर्धन समितीच्या बैठकीत झाला. त्यासाठी शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे सहकार्य घेण्याचे ठरले.
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात बुधवारी (दि.२) सायंकाळी बैठक झाली. नदी स्वच्छता व पर्यावरण कार्यकर्ते गणेश कलापुरे, दत्त मंदिराचे विश्वस्त राजाभाऊ बलकवडे, विंचुरकर वाडा लोकमान्य टिळक प्रथम गणपतीचे रवींद्र पठारे, पर्यावरण गतिविधिचे हेमंत आठवले, निंबाळकर तालीम गणेशोत्सव मंडळचे केदार गोरडे, सद्गुरु साई मंदिरचे निरंजन लोंबर, ब्राह्मण संस्थेचे विवेक भालेराव, मकरंद माणकीकर, जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळाचे पटवर्धन, औंधचे स्वप्निल जुनवणे बैठकीला उपस्थित होते.
कोरोनामुळे सजावट व अन्य गोष्टी होणार नाहीत, मात्र रोजची पूजाअर्चना होत राहणार. त्याचे निर्माल्य नदीत जाणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. निर्माल्य संकलन व खतनिर्मिती लोकसहभागातून प्रदूषण मुक्ती, प्लास्टिक कलेक्शन, कापडी पिशवीचा वापर, दैनंदिन जीवनात पर्यावरण स्नेही वस्तूंचा वापर, ओला-सुका कचरा व्यवस्थापन अशा विषयांवर बैठकीत चर्चा झाली. शहरातील धार्मिक संस्था, देवस्थाने, गणेशोत्सव मंडळ, गृह निर्माण सोसायटी यांचा यात सहभाग घेण्यासाठी त्यांच्याबरोबर संपर्क साधणे, त्यांना सक्रिय करणे यासाठी मंडळ प्रमुखांची सदिच्छा भेट घेण्याचे ठरले. लोकसहभागातून आणि जनजागरणातून पुणे शहर प्रदूषण मुक्त करणे असा ठराव करण्यात आला.