पुणे : सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजहित व आरोग्यहिताच्या दृष्टीने श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार आहे. बाप्पांच्या ऑनलाईन दर्शन सुविधेवर व ऑनलाईन कार्यक्रमांवर भर देण्यात येणार आहे. ऑगमेंटेड रिॲलिटी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून भक्तांना घरबसल्या मंदिराच्या गाभाऱ्यात बाप्पाची आरती करण्याचा अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून घेता येणार आहे. उत्सवाच्या काळात ट्रस्टचे विश्वस्त आणि कार्यकर्ते देखील मंदिरात जाणार नसल्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, ट्रस्टचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र परांजपे, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस माणिक चव्हाण, उत्सव प्रमुख हेमंत रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई व दररोज २१ किलो मिष्टांन्नाचा भोग चढवण्यात येणार आहे.
मंदिराच्या परिसरात पूर्णवेळ रुग्णवाहिका देखील असणार आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरूनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. हार, फुले, पेढे, नारळ देखील स्वीकारले जाणार नाहीत आणि प्रसाद दिला जाणार नाही.
------
ऑगमेंटेड रिॲलिटी तंत्रज्ञानाचा वापर
ऑगमेंटेड रिॲलिटी या तंत्रज्ञानाचा वापर हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख वैशिष्टय असणार आहे. ट्रस्टतर्फे एक लिंक देण्यात येणार असून त्यावरून घरी भक्तांनी आरती करतानाचा व्हिडिओ काढल्यास प्रत्यक्ष दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात श्रींची आरती करतानाचा व्हिडिओ तयार होणार आहे. आपण गाभाऱ्यात उभे राहून प्रत्यक्ष आरती करीत असल्याचा आनंद व्हिडिओ पाहून भक्तांना घेता येईल.
----------
विश्वस्त आणि कार्यकर्ते मंदिरात जाणार नाहीत
दैनंदिन धार्मिक विधी केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पडेल. भाविकांकरिता मंदिर परिसरात दोन मोठ्या एलईडी स्क्रिन लावण्यात येणार असून त्याद्वारे श्रींचे दर्शन घेता येईल. मंदिरासमोर दोन्ही बाजूला रेलिंग असेल.
-----------
स्थिरवादनाला परवानगी नाही
ढोल-ताशा पथकांनी यंदा स्थिर वादनाला परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, गर्दी टाळण्याचे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे नियोजन पोलिसांना करावे लागणार आहे. स्थिर वादनाला परवानगी दिल्यास मूळ उद्देशालाच बगल दिल्यासारखे होईल. त्यामुळे स्थिर वादनाला परवानगी देता येणार नाही, असे डॉ. रवींद्र शिसवे यांनी स्पष्ट केले.