श्रावण सुरू झाला की, विविध सण-उत्सवांची सुरुवात होते. संस्कृती आणि परंपरेचे मनोहारी दर्शन घडविणारे सण, उत्सव प्रत्येक घरोघरी आपल्या रीतिरिवाजानुसार साजरे करण्याची परंपरा खांडगे कुटुंबाने परदेशातही जपलेली आहे. खांडगे यांच्या घरी दरवर्षी दहा दिवस घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. विशेष बाब म्हणजे पौराणिक कथेचा संदर्भ घेऊन खांडगे कुटुंब दरवर्षी बाप्पांच्या पुढे देखावा सादर करतात. यंदा त्यांनी द्रौपदी स्वयंवराचा देखावा चलचित्रासह उभारला आहे. बाप्पांना नियमितपणे घरचा नैवेद्य दाखविला जातो.
उकडीचे मोदक, पुरणपोळी, शिरा आदी खास पारंपरिक पदार्थ बनविले जातात. आपल्या मातीतील उत्सव परदेशातही साजरा होत असल्याने गणेशोत्सवाच्या काळात अमेरिकेतील अनेक भारतीय कुटुंबे बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जून खांडगे यांच्या घरी हजेरी लावतात. हा देखावा तयार करण्यासाठी त्यांना नितीन पाटील, प्रशांत आला आणि निखिल खैरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. चलचित्रासाठी आवाज शुभंकर सातव यांनी दिला आहे.