लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नवे निर्बंध लावण्याचा कोणताही विचार नाही. परंतु लोकांनी खबरदारी न घेता गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी गर्दी केल्यास दुसऱ्या दिवसांपासूनच कडक निर्बंध लावण्यात येतील, असा इशारा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिला.
साप्ताहिक कोरोना आढावा बैठक झाल्यानंतर शुक्रवारी (दि. ३) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुणे शहराचा पाॅझिटिव्हिटी दर कमी असला तरी ग्रामीण भागाचा पाॅझिटिव्हिटी दर अपेक्षित प्रमाणात कमी झालेला नाही. जिल्ह्यात कोरोनाचा धोका कमी झाला नसून सणासुदीला गर्दी करून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका, असे पवार म्हणाले. विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुढाकार घेऊन बजाज कंपनीकडून सीएसआरमधून तब्बल दहा कोटी खर्च करून जिल्हा प्रशासनाला एक लाख लसीचे डोस उपलब्ध करून दिले. लवकरच आणखी पाच लाख डोस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हे लसीकरण प्राधान्याने झोपडपट्टीतील करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
चौकट
इंधन दरवाढीबाबत केंद्रावर टीका
“दहा महिन्यांपासून राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मोदी सरकारकडून याची कोणतीही दखल घेतली जात नाही, हे जनतेचं दुर्दैव आहे,” अशी टीका अजित पवारांनी केली. कोरोनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. तो नियंत्रित करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. मोदी सरकारने दिलेले हे ‘अच्छे दिन’ आहेत,” असे अजित पवार म्हणाले.
चौकट
केंद्र काय म्हणते माहिती घ्या
“काही लोक मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत. पण मंदिराचा मुद्दा हा राजकीय हेतूने आणला जात आहे. केंद्र सरकारनेच सांगितले की खबरदारी घ्या, मग हे राजकारण कशासाठी करताहेत?”
- अजित पवार
---------