पुणे : भारतीय समाजमनामध्ये उत्सवांचे स्थान महत्त्वाचे असून, गणेशोत्सवही तेवढ्याच धार्मिकतेने आणि उत्साहात साजरा केला जातो. पुण्यातल्या गणेशोत्सवाचे वेगळे महत्त्व असून, यंदाही हा उत्सव तेवढ्याच मंगलमय वातावरणात साजारा होईल, असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंडळाच्या देखाव्याच्या कामाचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. यंदा मंडळाकडून ब्रहस्पती मंदिराचा देखावा उभा करण्यात येणार आहे. या वेळी महापौर मुक्ता टिळक, पं. वसंतराव गाडगीळ, नगरसेवक हेमंत रासने, दगडूशेठ हलवाई मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे, माणिकराव चव्हाण, महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.बापट म्हणाले, गणेशोत्सवादरम्यान शहरातील मंडळांकडून रक्तदान, आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. समाजोपयोगी कामांमुळे गणेश मंडळांची समाजाशी नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे सामाजिक एकोपा वाढलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक लावता येतो. रात्री उशिरापर्यंत स्पीकर सुरू ठेवल्याने इतर लोकांना त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. हा त्रास टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ही बंधने घातली आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. नियमांचे पालन करून अतिशय शिस्तबद्धरीत्या यंदाचा गणेशोत्सव कार्यकर्ते साजरा करतील असा विश्वास असल्याचे ते म्हणाले. सर्व शुभचिन्हांचा या देखाव्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव यंदाही मंगलमय ठरेल
By admin | Published: April 24, 2017 5:12 AM