पुणे - गेली दोन वर्षे कोविडच्या परिस्थितीत साधेपणाने पुणे शहरातील सर्वच मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला. पण यंदाच्या वर्षी नेहमीच्या उत्साहात परंपरेप्रमाणे गणेशोत्सव साजरा होत आहे आणि त्यानुसार पुण्यातील मंडळे देखील तयारीला लागले आहेत. पुण्याचे अष्टविनायक म्हणजेच मानाचा पहिला कसबा गणपती मंडळ, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी मंडळ, मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळ, मानाचा चौथा महागणपती तुळशीबाग गणपती मंडळ, मानाचा पाचवा केसरी वाडा गणेशोत्सव मंडळ, श्रीमंत भाऊ रंगारी गणेशोत्सव मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ आणि अखिल मंडई मंडळ या पुण्यातील अष्टविनायक गणेशोस्तव मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव हे सांस्कृतिक पद्धतीने साजरा होणार आहे. या अष्टविनायक मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव नेमका कसा होणार याविषयी पत्रकार परिषद घेण्यात आली.
यंदाच्या वर्षी दारू मुक्त आणि प्लास्टिक मुक्त गणेशोत्सव करण्याचा निर्धार मंडळांकडून करण्यात आलाय. यासाठी 'मोरया कार्यकर्ता मंच'ची स्थापना होणार असल्याची माहिती कसबा गणपती मंडळ अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी यावेळी दिली. अष्टविनायक गणेशोत्सव २०२२ यांच्या वतीने आज (२७ ऑगस्ट) पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी कसबा गणपती, जोगेश्वरी मंडळ, गुरुजी तालीम, तुळशीबाग मंडळ, केसरीवाडा, भाऊ रंगारी, मंडई या सर्व मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय २०२३ मध्ये प्रत्येक गणेश मंडळाच्या मूर्तीची प्रतिकृती काश्मीरमध्ये नेण्यात येणार असून तिथं दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा होणार आहे. अशी माहिती भाऊसाहेब रंगारी मंडळाचे उत्सबप्रमुख पुनीत बालन यांनी दिली.
भाऊसाहेब रंगारी गणपती प्राणप्रतिष्ठापणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. आमच्याकडून सर्व स्वतंत्र सैनिकांना मानवंदना देण्यात येईल, तसेच पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येईल असं कसबा गणपती मंडळाकडून सांगण्यात आलं. जोगेश्वरी मंडळ गुढीपाडवा, दसरा, शिवरात्र यांसारख्या अनेक सणांचे देखावे साकारतील. कॉसमॉस बँकेच्या अध्यक्ष मिलिंद काळे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापणा होईल. गुरुजी तालीम मंडळात जान्हवी बालन यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापणा होईल. पहिल्या दिवशी मयूर रथातून श्रींची मिरवणूक निघेल. पाच संस्था निवडून त्यांच्या हस्ते दुपारी आरती होणार असून त्यांना २१,००० रुपये देणगी दिली जाईल. तुळशीबाग गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा पुनीत बालन यांच्या हस्ते होईल. यंदा लक्ष्मी रस्त्यावर तुळशीबाग मंडळाच्या गणपतीची प्राप्रतिष्ठापणा होईल.
यंदाच्या वर्षी तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळाने खूप कौतुकास्पद निर्णय घेतले आहेत. वाहतुकीला अडथळा होणार नाही आणि गर्दीचे नियोजन व्हावे यासाठी गणेश मंडळाचा रस्ता यंदा सुटसुटीत व्हावा यासाठी मंडळ प्रयत्नशील राहील. स्तनपान कक्ष उभारण्यात येणार असून नवजात बालक आणि महिलांसाठी विशेष सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवाय महिला स्वच्छतागृहाची व्यवस्था अवरजूनकरण्यात येणार आहे. मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा प्राणप्रतिष्ठापणा सकाळी १० वाजता होईल.
पुण्यात विरोध
या निर्णयाच्या वेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित नसल्यानं मंडळानं आता आपली भूमिका जाहीर करत आम्ही या निर्णयाशी सहमत नाही असं मत मांडलंय. आता पुण्यातील या अष्टविनायक मंडळामध्ये फूट पडली आहे की काय? असा प्रश्न केला जातोय. आज जी पत्रकार परिषद झाली त्यातील ज्या गोष्टी आहे त्याबाबत आम्हाला काहीच माहिती नव्हती. आम्ही आमच्या कामाच्या व्यस्ततेमुळे त्या पत्रकार परिषदेत जाऊ शकलो नाही. आज जी घोषणा करण्यात आली त्याबाबत पोलीस प्रशासनाने माहिती विचारली असता आम्ही अनभिज्ञ असल्याचं त्यांना सांगितलं. काश्मीरमध्ये जो गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याबाबत सुरक्षेतचा मुद्दा उपस्थित होतो. आम्ही ट्रस्टच्या वतीने बैठक घेतली. त्यात आम्ही या घोषणेशी सहमत नसल्याचं आज आम्ही जाहीर करत आहे दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी म्हटलंय.