पुणे : बाप्पा येणार म्हटल्यावर प्रत्येकाच्या आनंदाला आणि उत्साहाला उधाण आले होते. यात वयाचे कुठलेही बंधन नव्हते. लहानांपासून ज्येष्ठांपर्यत प्रत्येकाने लाडक्या गणरायाचे तितक्याच भक्तिभावाने केले. कपाळी गणपती बाप्पा मोरया नावाच्या पट्या बांधून, डोक्याला भगव्या रंगाचे फेटे बांधुन वेगवेगळ्या प्रकारची सुंदर वेशभुषा करुन तरुणाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सकाळी घरगुती गणरायांची लवकर प्राणप्रतिष्ठा करुन पुणेकर मानाच्या पाच गणपती मंडळाच्या मिरवणूका पाहण्याकरिता बाहेर पडले. रस्त्याच्या दुतर्फा त्यांनी मोठ्या दाटीवाटीत उभे राहून श्रींच्या मिरवणूकीचा आनंद घेतला.
ढोल ताशांच्या दणदणाटाने वातावरणात एक वेगळीच रंगत आणली. सहभागी झालेल्या प्रत्येक पथकाची वेगळी वेशभुषा होती. त्यामुळे आगळीच रंगसंगती यावेळी पाहवयास मिळाली. मोठ्या उत्साहात त्यांनी बाप्पासमोर आपली कला सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली. पथकांमध्ये तरुणांचा सहभाग तर होताच याशिवाय लहान मुलेही जल्लोषात वादन करताना पाहून अनेकांना त्यांचे छायाचित्र घेण्याचा मोह आवरला नाही. तरुणींने देखील फेटा बांधुन जोशात केलेले वादन अनेकांच्या कुतुहल आणि कौतुकाचा विषय होता. शनिवारवाड्याच्या बाहेर श्रींच्या मुर्त्यांच्या स्टॉलबाहेर देखील ढोल पथकांच्या काही तरुणांनी गर्दी केली होती. वाहतूक कोंडी टाळण्याकरिता तसेच नागरिकांना पर्यायी मार्ग सुचविण्यास मार्गदर्शन करत होते. यात विशेष करुन गणेशमुर्ती खरेदीसाठी शनिवारवाड्याजवळ गर्दी होत असल्याने गुरुवारी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला होता. याबरोबरच फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरुज, अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक, सोन्या मारुती चौक ते बेलबाग चौक ते सेवासदन चौक, मंगला टॉकीज समोरील प्रिमिअर गँरेज लेनमधून शिवाजी रस्ता ते खुडे चौक दरम्यान एकेरी वाहतूक सुरु होती.
मिरवणूक रथांची सजावट पाहून त्याला भरभरुन दाद नागरिकांकडून मिळत होती. फुलांची आकर्षक सजावट, काल्पनिक महाल, विद्युत रोषणाई, पीओपीच्या माध्यमातून विविध आकारातील, रंगाचा सुंदर उपयोग अनेक गणेशोत्सव मंडळांनी श्रींच्या मिरवणूक रथाची सजावट केली होती. श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंडळाच्या श्रींची मिरवणूक फुलांनी सजविलेल्या रथातून काढण्यात आली. गुरुजी तालीम मंडळ यांच्या श्रींच्या मिरवणूक रथ सर्वांच्या कौतुकाचा विषय होता. हुतात्मा बाबु गेनु मंडळ आणि भाऊ रंगारी गणेश मंडळ यांचे मिरवणूक रथ छान सजविण्यात आले होते. अनेक ठिकाणी रांगोळीच्या गालिच्यांनी मिरवणूकीचे मार्ग सजविण्यात आले होते. फुलांची सजावट करुन त्या मार्गावरुन श्रींची मुर्ती नेण्यात आली. दरम्यान शहरात उत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी मोठ्या संख्येने पोलीसांचा बंदोबस्त होता. शहरातील विविध चौकांमध्ये वाहतूक पोलीस आपली जबाबदारी बजावताना दिसत होते.
बँडवाल्यांची क्रेझ कायम डीजे आल्यापासून सणउत्सवापासून लांब गेलेल्या पारंपारिक बँडवाल्यांची क्रेझ अद्याप कायम असल्याचे श्रींच्या मिरवणूकीत पाहवयास मिळाले. वादनामुळे वेगळा माहोल तयार करणा-या बँडवाल्यांचा उत्साह वाढविण्याकरिता नागरिकांनी गर्दी केली होती. लक्ष्मी रस्त्यावरील प्रभात आणि न्यु गंधर्व बँडच्या वादनाने डीजे नव्हे तर आपलाच आवाज ‘‘कडक’’ असल्याचे यावेळी दाखवून दिले. गणरायाच्या विविध गाण्यांचे अतिशय सुंदर व कौशल्यपूर्ण सादरीकरण केले. विशेष म्हणजे यात बँडपथकातील सहभागी वादकांमध्ये सर्वाधिक संख्या ज्येष्ठ वादकांची होती. डीजेच्या प्रभावाने मागील काही वर्षांपासून बँडवाल्यांपुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र मानाच्या गणेशोत्सव मंडळाकडून त्यांना दरवर्षी सहभागी करुन घेतले जात असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.