पुणे : कामगारांचे पैसे न दिल्यामुळे ६ जणांच्या टोळक्याने ठेकेदाराला मारहाण करून शिवीगाळ केली. ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री नउच्या सुमारास मगरपट्टा पुलाखाली घडली. याप्रकरणी जयसिंग राठोड (वय ४०, सोनार आळी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
जयसिंग राठोड बांधकाम ठेकेदार आहेत. ते १९ मार्च रोजी रात्री ९ वाजता मगरपट्टा परिसरात चहा पित होते. त्यावेळी तीन दुचाकीवर आलेल्या ६ जणांनी त्यांना हाताने मारहाण केली. त्यांच्यातील एकाने त्यांना घरातून पैसे मागून घे, नाहीतर तुला मारून टाकू, अशी धमकी दिली . त्यावेळी बांधकाम व्यावसायिकाने फसविले असल्यामुळ पैसे नसल्याचे जयसिंग यांनी आरोपींना सांगितले. त्यानंतर आरोपींनी त्यांना मगरपट्टा पुलाखाली नेऊन कामगारांचे पैसे कधी देणार असे म्हणून मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण तपास करीत आहेत.