पुणे : कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीची ‘नाकाबंदी’ पोलिसांनी सुरू केली असून, सराईत सागर रजपूत पाठोपाठ आणखी दोन गुन्हेगाराला बेकायदा पिस्तुलांसह जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. या दोघांकडून एकूण तीन बेकायदा पिस्तुलांसह 10 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली. अविनाश सोमनाथ कंधारे (वय २६, रा. किष्किंधानगर, कोथरूड) आणि ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (वय २८, रा. तानाजीनगर, धनकवडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. रजपूतकडे त्याच्याकडे गजा मारणे टोळीच्या सद्य:स्थितीतील हालचालींबाबत चौकशी करण्यात येत आहे. त्याच्याकडूनच कंधारे आणि धर्मजिज्ञासून यांच्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यांच्याकडे तीन पिस्तुले असल्याची माहिती मिळताच सापळा रचून आरोपींना जेरबंद केले. कंधारे याच्या घरामधून देशी बनावटीची दोन पिस्तूल आणि सहा काडतुसे, तर तर धर्मजिज्ञासूकडून १ पिस्तूल आणि ४ काडतुसे असा एकूण १ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंधारेवर दंगलीचा एक गुन्हा दाखल आहे. तर, धर्मजिज्ञासूवर खून, खंडणी, अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. युनीट चारचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड, सहायक निरीक्षक नितीन भोयर, गणेश पाटील, अन्सार शेख, विलास पलांडे, सहायक फौजदार दिलीप लोखंडे, राजू मचे, संजय गवारे, संतोष बर्गे, हेमंत खरात, राजेंद्र शेटे, धर्मराज अवाटे, प्रमोद लांडे, अमित गायकवाड, राजाराम काकडे, स्वप्नील शिंदे, प्रमोद हिरळकर, सुनील चौधरी, प्रमोद वेताळ, गणेश काळे, सलीम शेख, गोपाल ब्रह्मादे यांनी ही कारवाई केली.आरोपींकडे गेल्या एका वर्षापासून ही पिस्तूल आहेत. त्यांनी याचा वापर कुठे केला आहे का, याचा तपास सुरु आहे. ही शस्त्रे तपासासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत.
गजा मारणे टोळीची नाकाबंदी
By admin | Published: September 02, 2016 5:56 AM