लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मौजमजेसाठी वाहनचोरी करणाऱ्या टोळीस भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.दाश्या ऊर्फ दशरथ सिद्धाराम गायकवाड, ॠषिकेश सिद्धार्थ नंदुरे आणि एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : भारती विद्यापीठ त्रिमूर्ती चौक येथे गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी सर्फराज देशमुख व महेश मंडलिक यांना एका दुचाकीचा नंबर बनावट असल्याचा संशय आला. त्याला थांबण्यास सांगितले असता तो न थांबल्याने त्याचा पाठलाग करून त्याला थांबविण्यात आले. त्याने गाडीबाबत असमाधानकारक उत्तरे दिली. गाडीचा नंबर बनावट असल्याची खात्री झाल्याने आरोपी ॠषिकेश याने गाडी चोरल्याचे कबूल केले. त्याचप्रमाणे आरोपी गायकवाड आणि त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही संतोषनगर कात्रज भागातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ६ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, भारती विद्यापीठ आणि सिंहगड पोलीस ठाण्याकडील गुन्हे उघडकीस आले आहेत.परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे, स्वारगेट विभाग पुणेचे सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भारती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समाधान कदम, पोलीस कर्मचारी अरुण मोहिते, अमोल पवार, प्रणव संकपाळ, कुंदन शिंदे, सर्फराज देशमुख, उज्ज्वल मोकाशी, गणेश चिंचकर, महेश मंडलिक यांनी ही कामगिरी केली.
मौजमजेसाठी वाहनचोरी करणाऱ्या टोळीला अटक
By admin | Published: May 15, 2017 6:45 AM