पिंपरी : दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच दगडफेक करून दोन वाहनांचे नुकसान केले. जुनी सांगवी येथे अभिनव नगरमध्ये गुरुवारी (दि. ३०) रात्री १०:३५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
आदित्य राम गायकवाड (२१, रा. अभिनव नगर, जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ३१) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ओमकार संतोष रहाटुळ (१९, रा. विनायकनगर, नवी सांगवी), सम्यक अजित लोखंडे (१९, रा. कृष्णराज काॅलनी, पिंपळे गुरव), अथर्व अनिल लाड (२०, रा. फेमस चौक, नवी सांगवी), आयुष सचिन भोसले (१९, रा. गणेशनगर, बोपखेल), गरुनाथ सुभाष बिराजदार (२१, रा. कुंदननगर, फुगेवाडी) यांना पोलिसांनीअटक केली. त्यांच्यासह शुभम नावळे (रा. सांगवी) आणि चार अल्पवयीन संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बीएनएस कलम १०९, ११०, १८९ (२), १९१ (२), १९१ (३), १९०, ३२४ (४), ११५ (२), ३५२ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२७) सह फौजदारी सुधारणा कायदा कलम ३, ७ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१), १३५ अन्वये पोलिसांनी गुन्हा नोंद केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून संशयितांनी तीन दुचाकींवरून येऊन फिर्यादी आदित्य गायकवाड यांच्यावर ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केले. तसेच रस्त्यावरील दगड उचलून आदित्य यांच्या दिशेने फेकले. या दगडफेकीमध्ये इमारतीसमोर पार्क केलेल्या दोन वाहनांचे नुकसान झाले. त्यानंतर संशयितांनी आरडाओरड केली. आम्ही शुभम नावळे भाईच्या गँगचे आहे, आमची येहृे दहशत आहे. आम्हाला कोण नडले तर त्याचा असाच गेम करणार, असे बाेलून संशयितांनी परिसरात दहशत निर्माण केली. सहायक पोलिस निरीक्षक युवराज कलकुटगे तपास करीत आहेत