लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हडपसर गावातील सराफी दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली.
ओंकार नीलेश कोकरे (वय २१), तन्मय अजित बेडगे (वय २०, दोघेही रा. हडपसर) आणि प्रसाद कल्याण बिराजदार (वय २२, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) अशी अटक केल्यांची नावे आहेत. त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बेडगे आणि बिराजदार हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून २ दुचाकी, पालघन, कटावी, २ नॉयलॉनच्या दोर्या, २ स्क्रु ड्रायव्हर, बोअर कटर, एक्सा ब्लेड, मिरची पावडर असा ८० हजारांचा माल जप्त केला आहे.
हडपसर पोलीस पथकातील प्रभारी अधिकारी हनुमंत गायकवाड, उपनिरीक्षक सौरभ माने, पोलीस कर्मचारी गोसावी, मुंडे, नाळे, टोणपे हे रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना त्यांना काळेपडळ परिसरात आल्यानंतर बिराजदार झोपडपट्टी मागील कॅनॉल रस्त्याच्या बाजूला ५ जण थांबले असल्याचे व त्याच्याकडे दोन दुचाकी असून ते हडसर येथील सराफी व्यावसायीकाला लुटणार असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना पाहून पळून जाणार्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.