पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने या संदर्भात सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले या प्रकरणी राजन गोपाल नायर (वय ३१), राहुल गोटीराम साळुंखे (वय ३३, दोघेही रा. न्यू कोपरे रोड, उत्तमनगर, ता. हवेली), आकाश तायप्पा कानडे (वय २१, रा. वडारवस्ती, येरवडा, पुणे), अक्षय मधुकर कोळके (वय २७, रा. रायकर मळा, धायरी, पुणे) व सुरज दिलीप जाधव (वय २८, रा. रविवार पेठ, तांबोळी मस्जिदजवळ, पुणे) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस पथक हद्दीमध्ये गस्त करीत असताना हृषीकेश ताकवणे व हृषीकेश व्यवहारे यांना त्यांच्या गोपनिय बातमीदारार्फत माहिती मिळाली. गुन्हेगारी अभिलेखावरील राजन नायर व त्याचे साथीदार हे लोणी कंद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अष्टापूर ते राहू या रस्त्यावर सिद्धीविनायक डेव्हलपर्स जवळ रात्रीच्या वेळी येणा-या जाणा-या वाहन चालकांना लूटमार करून दरोडा टाकण्याच्या तयारीत थांबलेले आहेत. पोलीस पथकाने पोलीस निरीक्षक गणेश माने मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून या पाच जणांना जेरबंद केले आहे.
त्यांच्याकडे लोखंडी कोयता, चाकू, मिरची पूड, एक दुचाकी, नायलॉन दोरी, मोबाईल फोन असा एकूण ७८,०८६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांच्याविरुद्ध लोणी कंद पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशी केली असता ते पुणे शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. राजन नायर व राहुल साळुंखे याच्याविरुध्द जबरी चोरी, वाहन चोरी, दरोड्याची तयारी व इतर शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत. आकाश कानडे याच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात भांडणे व हत्यार बाळगलेचा गुन्हा दाखल आहे. अक्षय कोळके याच्याविरुध्द वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दरम्यान राजन नायर व राहुल साळुंखे याच्याकडून कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील एक गुन्हा व खडक पोलीस ठाण्यातील जबरी चारीचा गुन्हा उघडकीस आला आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतीक लाहिगुडे, सचिन पवार, हृषीकेश ताकवणे, हृषीकेश व्यवहारे, हृषीकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे व सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली आहे.