लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वाढदिवसाच्या पार्टीसाठी आलेल्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आपल्या आणखी दोन मित्रांना बोलावून त्यांनाही तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे असल्याचे सांगून गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला.
गुन्हे शाखेच्या युनिट-२ च्या पथकाने यातील एक आरोपी श्रीकांत काळे याला पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत १५ दिवसांपूर्वी झालेला हा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी जनता वसाहतीत राहणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीने दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी यातील ५ जणांना ताब्यात घेतले असून तिघांना अटक केली आहे.
कृष्णा ऊर्फ रोहन अशोक ओव्हाळ (वय २४, रा. हडपसर), निरंजन ऊर्फ नीलेश शिंदे (वय २०, रा. वारजे माळवाडी) आणि श्रीकांत राजेंद्र काळे (वय २३, रा. एस आर ए म्हाडा बिल्डिंग, वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: फिर्यादी व तिच्या मैत्रिणीला त्यांच्या एका मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १५ दिवसांपूर्वी वारजे माळवाडी येथील एसआरए बिल्डिंगमधील श्रीकांत काळे याच्या रुमवर नेले होते. तिथे तिघांनी फिर्यादीवर बलात्कार केला. त्यानंतर आणखी दोन मित्रांनाही तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहे़ असे सांगून तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. तिने न ऐकल्याने पोटमाळ्यावर असलेल्या पिस्तुलातून आरोपीने फिर्यादीच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने तिच्या छातीजवळ असलेल्या मोबाईलवर ही गोळी लागल्याने तिला किरकोळ जखम झाली. तेव्हा त्यांच्यातील एकाने हा चुकून प्रकार घडला आहे. याबाबत तू कोणाला सांगितले तर तुला खरोखरच मारून टाकीन अशी धमकी दिली. त्यानंतर ही मुलगी घरी आली. बहिणीला तिने आपल्याला लोखंडी बार लागल्याचे सांगितले. आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिली असल्याने तिने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता.
दरम्यान, श्रीकांत राजेंद्र काळे हा धनकवडी स्मशानभूमीजवळ थांबला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाला मिळाली. त्यावरुन पोलिसांनी सापळा रचून त्याला २७ मार्च रोजी पकडले. त्याच्याकडून २५ हजार रुपयांचे गावठी पिस्तूल व ३ काडतुसे जप्त केली. त्याच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडे पिस्तुलाबाबत चौकशी करत असताना जप्त केलेल्या पिस्तुलातून गोळी झाडण्यात आल्याचे पोलिसांना आढळून आले. त्याची चौकशी करीत असताना हा प्रकार समोर आला आहे. श्रीकांत काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.
..........
मोबाईलमुळे वाचला जीव
तिघांनी आळीपाळीने बलात्कार केल्याने या मुलीला त्रास होत होता. असे असताना त्यातील एक आरोपी आणखी दोन मित्र येत आहेत. त्यांच्यासाठी थांब असे म्हणत होता. तिने बाहेर जाण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपीने पिस्तुलातून तिच्यावर गोळीबार केला. सुदैवाने ती गोळी तिने छातीजवळ ठेवलेल्या मोबाईलला लागली. त्यामुळे तिला जखम झाली. त्यातून रक्त येत होते. तेव्हा इतरांनी तिच्या जखमेतून मोबाईलचे बारीक तुकडे काढले. त्यावर ड्रेसिंग केले. मोबाईलमुळे या मुलीचा जीव वाचला.