पुणे : ग्रामीण पोलिसांकडे दाखल असलेल्या दरोडे, जबरी चोरी आणि मारहाणीच्या गुन्हामध्ये फरार असलेल्या चारजणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) गजाआड केले. मावळ तालुक्यातील कार्ला येथे ही कारवाई करण्यात आली. यासोबतच जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडून जेजुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक डॉ. जय जाधव यांनी एलसीबीच्या पथकाला २५ हजार रूपयाचे बक्षीस जाहिर केले आहे. दिपक उर्फ दिप्या लालदशा भोसले (वय २५), भोप्या उर्फ गोठया लालदशा भोसले (वय २२, दोघे रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), महेंद्र उर्फ जयेंद्र काढण्या भोसले (वय २३, रा. घारगाव, ता. श्रीगोंदा), उदाशा लाल्या उर्फ लालदशा भोसले (वय ४३, रा. वाळुंज, ता. श्रीगोंदा) आणि सुरेश उर्फ गणेश उर्फ विवेक झेमाजी उर्फ झम्या शिंदे (वय १९, रा. सासवड झणझणे, ता. फलटण) अशी आरोपींची नावे आहेत. दिपकविरूध्द ७ गुन्हे दाखल असून तो पाच वर्षांपासून फरार होता. तर भोप्या विरूध्द ५, महेंद्र विरूध्द ३ आणि उदाशा विरूध्द एक गुन्हा दाखल आहे. दीपक आणि भोप्यावर मोक्का देखील लावण्यात आलेला आहे. चारही आरोपींविरूध्द पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार आहेत. हे चौघेही कार्ला येथील एकविरा देवीच्या यात्रेमध्ये चोरीसाठी येणार असल्याची माहिती एलसीबीला मिळाली.वरिष्ठ निरीक्षक राम जाधव, उपनिरीक्षक अंकुश मारे, सहाय्यक उपनिरीक्षक गिरमकर, कर्मचारी एस.ए. जावळे आणि एस.एस. माने यांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना गजाआड केले.
दरोडे टाकणारी टोळी एलसीबीकडून गजाआड
By admin | Published: April 16, 2016 3:47 AM