लोकमत न्यूज नेटवर्क
कुरकुंभ : कुरकुंभ (ता.दौंड) येथील आैद्योगिक परिसरात रेमडेसिविर इंजेक्शन मुंबईतून पुण्यात आणून ते काळ्याबाजारात २५ हजाराने विक्री करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून १ ॲक्टेंमरा व ६ रेमडेसिविर असे एकूण ७ इंजेक्शन व इतर मुद्देमाल असा एकूण ३ लाख ६२ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दत्तात्रय मारुती लोंढे (वय ३५, रा.संम्मती अपार्टमेंट, प्लॅट नं. २०७, दौंड), अदित्य अनिरुध्द वाघ (वय २५, रा.साईनाथनगर, पोफळे स्टेडीयमजवळ, निगडी, पुणे, मूळ रा. आणेवाडी, ता. जि. सातारा), अमोल नरसिंग मुंडे (वय २५, रा. कळवा नाका, सिध्दिविनायक सोसायटी, रूम नं.२०३, नवी मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी जिल्ह्यात कोरोना उपचारासाठी वापरण्यात येणारे रेमडेसिविर इंजेक्शनची शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री होत असल्याची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना दिले होते. यासाठी विषेश पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकाला कुंरकुंभ येथील आैद्योगिक वसाहतीतील रिलायन्स कंपनीसमोर ॲक्टेंमरा व रेमडेसिविर इंजेक्शन वरील तिघे जण काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी आणणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी त्या ठिकाणी सापळा रचला. यावेळी आरोपी हे ॲक्टेंमरा इंजेक्शन १ लाख ५० रुपयाला रुपयाला, तर रेमडेसिविर इंजेक्शन प्रत्येकी २५ हजार रुपयाला एक असे विक्री करीत असताना मिळून आले. पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून ६० हजार ६७५ रुपयांचे १ ॲक्टेंमरा इंजेक्शन व ६ रेमडेसिविर इंजेक्शन, ५१ हजार ५०० रुपये रोख, ३० हजारांचे तीन मोबाईल, ७० हजार रुपयांची एक दुचाकी, तर १ लाख ५० हजार रुपयांची मोटार असा एकूण ३ लाख ६२ हजार १७५ रुपयांचा माल जप्त केला.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, शब्बीर पठाण, महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरू गायकवाड, मुकेश कदम, प्रमोद नवले, अक्षय नवले, बाळासो खडके, प्रसन्न घाडगे यांनी केली.
फोटो आहे :