लाेकमत न्यूज नेटवर्क
शेलपिंपळगाव : बहुळ (ता. खेड) हद्दीतील भीमाभामा नदीवरील बहुळ - कोयाळी - मोहितेवाडी बंधाऱ्याचे लोखंडी ढापे चोरून पळणाऱ्या एका टोळीला येथील स्थानिक तरुणांच्या सर्तकतेमुळे पकडण्यात यश आले आहे.
हा प्रकार मोहितेवाडी हद्दीत शुक्रवारी (दि. १७) पहाटे तीनच्या सुमारास उघड झाला. भीमाभामा नदीवर कोयाळी, मोहितेवाडी व बहुळ या तीन गावांच्या मध्य ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. सध्या पावसाळी हंगाम असल्याने बंधाऱ्याचे लोखंडी ढापे बाजूला काढून ठेवण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी पहाटे चोरट्यांचे टोळके अंदाजे ३० ते ४० ढापे चोरून ते पिकअपमध्ये टाकून पळून जात होते. ही बाब स्थानिक तरुणांच्या लक्षात आल्यानंतर या तरुणांनी दोन्ही वाहनांचा पाठलाग करून टेम्पो पकडला. परंतु, यातील पिकअप गाडीला चोरट्यांनी चाकण - शिक्रापूर महामार्गाने सुसाट वेगाने पळवले. यादरम्यान मोहितेवाडी चौकात या पिकअपने एका दुचाकीला धडक दिली. त्यामुळे पिकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटून गाडी रस्त्यालगत असलेल्या गादीच्या व अन्य एका दुकानाला जाऊन धडकली. यावेळी तत्परता दाखवत स्थानिकांनी चोरट्यांना पकडले.
चाकण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, याप्रकरणी चार - पाचजणांना (नावे समजू शकले नाहीत) ताब्यात घेण्यात आले आहे. या परिसरात मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या चोरीच्या घटना घडत होत्या. यात प्रामुख्याने विद्युत रोहित्र वारंवार चोरीला जात होती. त्यामुळे उघड झालेल्या या चोरीमुळे अन्य काही चोऱ्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
चौकट :
लघुशंकेमुळे वाचला जीव...
चाकण - शिक्रापूर महामार्गावर मोहितेवाडी चौकात परप्रांतीय व्यावसायिक गादी - उशा, झोके, कापडी बाहुल्यांची विक्री करत आहेत. हे व्यावसायिक रात्रीचा मुक्काम रस्त्यालगत उभारलेल्या दुकानात करतात. शुक्रवारी लोखंडी ढापे चोरून पलायन करणाऱ्या चोरट्यांची सुसाट गाडी येथील दुकानात शिरली. यावेळी सुदैवाने दुकानात झोपलेला संबंधित व्यावसायिक लघुशंकेला बाजूला गेल्याने त्याचा जीव वाचला.
फोटो ओळ : मोहितेवाडी हद्दीत लोखंडी ढापे चोरून पलायन करताना पकडलेला टेम्पो. दुसऱ्या छायाचित्रात पीकअप गाडी शिरलेले दुकान.