पुणे : कोथरूडमधील सुतारदरा परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी टोळक्याने दुकानाच्या शटरवर रॉकेल टाकून पेटवून देण्याबरोबरच दुचाकींची तोडफोड केली. टोळक्याने दोन दुचाकी जाळण्याचा प्रयत्न केला. पाच ते सातजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी साहिल हनुमंत हळंदे (रा. सुतारदरा, कोथरूड) याच्यासह पाच ते सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संकेत काटवळ (वय २६, रा. सुतारदरा, कोथरूड) याने यासंदर्भात कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हळंदे आणि त्याच्याबरोबर असलेले साथीदार सुतारदरा परिसरातील समर्थ कॉलनीत शुक्रवारी (दि.१) पहाटे पाचच्या सुमारास आले. त्यांच्याकडे कोयते होते. हळंदे आणि साथीदारांनी शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यांनी रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकींची तोडफोड केली. बंद असलेल्या एका दुकानाच्या दरवाज्यावर रॉकेल ओतून दरवाजा पेटवून दिला.
त्यानंतर परिसरातील २ दुचाकींवर रॉकेल ओतून त्या पेटवून दिल्या. मोटारीची काच फोडली. या भागातील रहिवाशांना शिवीगाळ करून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक भैरव शेळके तपास करत आहेत.