पुणे : भाडे न दिल्याने जिमचे साहित्य मालकाच्या ताब्यात असतानाही १५ ते २० जणांच्या टोळक्यांनी जबरदस्तीने हॉटेलमध्ये शिरून तोडफोड करून ४० हजार रुपयांचे नुकसान करून जिमचे साहित्य चोरून नेले.
याप्रकरणी हॉटेल व्यावसायिक नीरज छाब्रा (वय ५६, रा. विमाननगर) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आसिफ अहमद अन्सारी, अभिजित पालांडे (रा. वाघोली) आणि एका महिलेसह त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विमाननगर येथे छाब्रा यांचे हॉटेल ईलाईट हा व्यवसाय आहे. हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर त्यांनी आरोपींना जीमसाठी जागा भाड्याने दिली होती. मात्र, मागील काही महिन्यांपासून त्यांनी भाडे थकविले होते. आरोपी व फिर्यादीमध्ये ठरलेल्या तडजोडीप्रमाणे फिर्यादींनी आरोपींच्या जिमचे साहित्य हॉटेलच्या पार्किंगच्या आवारात ठेवले होते. साहित्य घेऊन जाण्यावरून त्यांच्यात वाद होता. दरम्यान, आरोपींनी फिर्यादींची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता त्यांच्या हॉटेलमध्ये शिरले. त्यानंतर तेथील कामगारांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच, हॉटेल व जिम असलेल्या ठिकाणांची तोडफोड केली. त्यानंतर जिमचे साहित्य घेऊन त्यांनी पोबारा केला. सहायक पोलीस निरीक्षक लहाने तपास करीत आहेत.