लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : उत्तर प्रदेशातील कंपनीत भाड्याने कार लावतो, असे सांगून वेगवेगळ्या लोकांकडून तब्बल २८ वाहने घेऊन त्यांची परराज्यात परस्पर विक्री करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १३ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
मलिक बाबा शहा ऊर्फ मुजाहिद रफिउद्दीन सय्यद गिलानी (वय ३८, रा. युनिटी टॉवर, शिवनेरीनगर, कोंढवा), ओंकार ज्ञानदेव वाटाणे (वय २८, रा. हिंगणी बर्डी, ता. दौंड), मोहमद मुजीब मोहमद बसीर उद्दीन (वय ४८, रा. संतोषनगर, हैदराबाद, तेलंगणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
उत्तर प्रदेशातील नोएडा येथील युनायटेड एसएफसी सर्व्हिस नेटवर्क टॉवर कंपनीमध्ये आपण कामाला असल्याचे मलिक शहा याने लोकांना सांगितले होते. त्या कंपनीमध्ये वाहने भाडेतत्वावर लावतो, असे सांगून काही जणांकडून १५ मार्च ते २७ जुलै २०२१ दरम्यान २८ वाहने घेतली. या वाहनांवरील जीपीएस यंत्रणा काढून टाकली. या गाड्या कंपनीत भाड्याने न लावता परस्पर विकली. कार दिलेल्या फिर्यादीने नोएडा येथे जाऊन चौकशी केल्यावर अशी कोणतीही कंपनी नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना युनिट ६ च्या पथकातील पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना यातील एक कार दौंड एसटी स्टँडला विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारसह तिघांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी तेलंगणा सीमेवरील नांदेड जिल्ह्यातील बिलोली, निजामाबाद जिल्ह्यातील बालकोंडा येथे विकल्याची माहिती दिली. त्यावरून पोलीस पथकाने तेथे जाऊन एकूण १३ वाहने जप्त केली आहेत. इतर वाहनांचा शोध सुरू आहे.
अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार चच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे व सुहास तांबेकर यांनी ही कामगिरी केली.