पुणे : चारचाकी वाहनांचे शाेरूम फाेडून राेख रक्कम चाेरी करणाऱ्या सराईतांच्या टाेळीस पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने जेरबंद केले. महाराष्ट्रासह कर्नाटकातील आठ आणि गाेवा राज्यात टाेळीने केलेले २१ शाेरूम फाेडत रक्कम चाेरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सावन दवल माेहिते (वय १९), साेनु नागुलाल माेहिते (वय २२), अभिषेक देवराम माेहिते (वय २०), जितु मंगलसिंग बेलदार( वय २३, चाैघे रा. बाेधवड, जि. जळगाव), बादल हिरालाल जाधव (वय १९, रा. मुक्ताईनगर, जळगाव) आणि पिंटु देवराम चाैहान ( वय १९ रा. इंदाैर मध्यप्रदेश) अशी अटक आराेपींची नावे आहेत. बिबवेवाडी परिसरात दि. २८ जुलै राेजी देवकी माेटर्स शाेरूम फाेडून चाेरट्यांनी ४ लाख ९६ हजारांची रक्कम चाेरली हाेती. तत्पूर्वी भारती विद्यापीठ पाेलीस ठाणे हद्दीतही याप्रकारचे दाेन गुन्हे घडले हाेते गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने गुन्ह्यांची माहिती घेत तपासाला सुरूवात केली. पथकातील कर्मचाऱ्यांनी १९ किमी रस्त्यावरील सीसीटिव्ही चित्रफितींची पाहणी केली. तसेच एका संशयित गाडीच्या क्रमांकावरून मालकांची माहिती मिळविली. ताे मुळचा जळगाव येथील असल्याचे समजताच पथक जळगावला रवाना झाले.
पाेलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, उपनिरीक्षक अविनाश लाहाेटे, अंमलदार चेतन चव्हाण,राजस शेख, पृथ्वीराज पांडुळे, राहुल ढमढेरे, विलास खंदारे, दाउद सय्यद, अमित कांबळे, रमेश साबळे, दया शेगर, प्रताप गायकवाड, प्रमाेद टिळेकर, अश्रुबा माेराळे, अकबर शेख आदींच्या पथकाने कामगिरी केली.
अखेर मुंबईत पकडण्यात यश
जळगाव येथे आराेपींचा शाेध घेत असताना सर्व संशयित उत्तर भारतात फिरायला गेल्याचे समजले. विविध पथकांनी दिल्ली, मथुरा, हरिव्दार येथे जात आराेपींचा माग काढला. मात्र, तेथून आराेपी रेल्वेने मुंबईला निघाल्याचे समजले. त्यामुळे मुंबईतील बांद्रा येथे सापळा लावत अखेर सहा जणांना ताब्यात घेतले.
चाेरीच्या पैशांवर गाेव्यात माैजमजा
आराेपींनी दि. २१ जुलै राेजी पुण्यातील टाेयाटाे, ह्युदाई शाेरूममध्ये चाेरी केली. तेथून ते मुंबई-बंगळुरू महामार्गाने गाेव्याला निघाले. रस्त्यात कर्नाटकातील शिमाेगा जिल्ह्यांत शाेरूम फाेडून चाेरी केली. चाेरलेल्या पैश्यांवर गाेव्यात माैजमजा केली. परतत गाेव्यातील वेरना पाेलीस ठाणे हद्दीत आणखी दाेन शाेरूम फाेडले हाेते.