- किरण शिंदे
पुणे :पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहराजवळ असणाऱ्या जगदंब हॉटेलमध्ये अविनाश बाळू धनवे (वय ३१) या तरुणाचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या हत्याकांडाचे सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले असून चार आरोपींना अटक केली आहे. तुरुंगात झालेल्या मारहाणीचा बदला म्हणून आरोपींनी अविनाश धनवे याचा खून केल्याचे आता तपासात समोर आले आहे.
शिवाजी बाबुराव भेंडेकर (वय ३५, पद्मावती रोड, साठे नगर, आळंदी देवाची), मयूर उर्फ बाळा मुकेश पाटोळे (वय २०, आंबेडकर चौक, पोलीस चौकीसमोर आळंदी देवाची), सतीश उर्फ सला उपेंद्र पांडे (वय २०, चरवली रोड, सोपानजाई पार्क, आळंदी देवाची) आणि सोमनाथ विश्वंभर भत्ते (वय २२, मरकळ रोड, सोळू) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर आणखीन चार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अविनाश धनवे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याची आळंदी आणि चरोली परिसरात दहशत होती. आळंदी परिसरातील गुन्हेगारी टोळ्यांसोबत त्याचे वैमनश्य होते. त्याच्याविरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर असे सहा गुन्हे दाखल आहेत. २०२० मध्ये त्याच्या विरोधात मुक्का लावण्यात आला होता. तेव्हापासून तो तुरुंगात होता. फेब्रुवारी महिन्यात तो तुरुंगातून सुटून आला होता. तर आरोपी शिवाजी भेंडेकर हा देखील खुनाच्या गुन्ह्यात २०१२ पासून तुरुंगात होता. २०२२ मध्ये त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. तुरुंगात असताना धनवे यांनी शिवाजी भेंडेकर आणि मयूर उर्फ बाळा मुकेश पाटोळे याला मारहाण केली होती. याच मारहाणीचा बदला त्यांनी धनवेचा खून करून घेतलाय अशी माहिती आता समोर येत आहे.
दरम्यान ज्या दिवशी अविनाश धनवे याचा खून झाला त्या दिवशी तो आळंदी येथून पंढरपूरला जाण्यासाठी निघाला होता. तेव्हापासूनच आरोपी त्याच्या मागावर होते. इंदापूर परिसरातील जगदंब हॉटेलवर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अविनाश धनवे आणि त्याचे मित्र जेवण करण्यासाठी थांबले होते. हीच संधी साधून आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. आरोपी मयूर उर्फ बाळा मुकेश पाटोळे यांनी सर्वात आधी अविनाशवर गोळी झाडली. त्याच्यावर एकूण चार गोळ्या झाडण्यात आल्या. आणि त्यानंतर चार कोयत्याने वीस हुन अधिक वार करण्यात आले. डोक्यात गोळी लागल्याने अविनाश धनवेचा जागीच मृत्यू झाला होता.