पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुंडांवर शहर पोलीस वेगवेगळ्या कारवाया करीत असताना कुख्यात गुंड निलेश घायवळ याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे़. आज त्याला येरवडा तुरुंगातून सोडण्यात आले़ त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे़. निलेश घायवळ आणि गजानन मारणे या दोन टोळ्यांमधील वैमनस्यातून पुणे शहरात अनेकदा गॅंगवॉर झाले आहे़. त्यामुळे या दोन्ही टोळ्यांमधील बहुतांश गुंडांवर पोलिसांनी कारवाई करुन त्यांना तुरुंगात टाकलेले आहे़. निलेश घायवळ याच्या टोळीची कोथरुड परिसरात दहशत असून त्याच्यावर पोलीस रेकॉर्डवर २३ ते २४ गुन्हे दाखल आहे़. गजानन मारणे आणि घायवळ टोळीयुद्धांमध्ये २०१० मध्ये दत्तवाडी परिसरात ८ जून २०१० रोजी निलेश घायवळ व त्याच्या टोळीने गोळीबार करीत सचिन कुडले याचा खुन केला होता़. या खटल्यात फेब्रुवारी २०१९ मध्ये निलेश व त्याच्या साथीदारांची निर्दोष सुटका झाली होती़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल होता़. या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे़. येरवडा कारागृहातून आज सकाळी त्यांची सुटका झाली़. त्यानंतर त्याला कोथरुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़. त्याला उच्च न्यायालयाने कोणत्या निकषावर जामीन मंजुर केला व त्यातील अटी काय आहेत, याची माहिती घेण्यात येत आहे़. तसेच त्याच्यावर यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यांची सध्यस्थिती काय आहे, याची माहिती घेतली जात आहे़. त्यानंतर पुढील काय पावले उचलायची हे ठरविण्यात येणार आहे़. कोथरुड पोलीस सध्या निलेश घायवळ याची चौकशी करीत आहेत़.विधानसभा निवडणुकीच्या काळातच निलेश घायवळ याची सुटका केल्याने आता पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे़. कोथरुड विधानसभा मतदारसंघात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, महसुल मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे निवडणुकीला उभे राहणार आहेत़. त्यात मतदार संघात बाहेरचा उमेदवार असा प्रचार त्यांच्याविरुद्ध होत आहे़. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघातील घडामोडीवर राहणार आहे़ .अशा काळात त्या भागात दहशत असलेला गुंड तुरुंगातून बाहेर आल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे़.
कुख्यात गुंड निलेश घायवळला जामीन ; पोलिसांची डोकेदुखी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 3:27 PM
विधानसभा निवडणुकीच्या काळातच निलेश घायवळ याची सुटका केल्याने आता पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे़..
ठळक मुद्देनिलेश घायवळ आणि गजानन मारणे या दोन टोळ्यांमधील वैमनस्यात शहरात अनेकदा गॅंगवॉर