लोणी काळभोर (पुणे) : वडकी येथे गांजा विकणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले. पोलिसांनी त्यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपयांचा १० किलो गांजा जप्त केला. राजेशकुमार विजय (वय २३, रा. गायकवाडवाडी रोड, सिद्धिविनायक पार्कशेजारी, वडकी), राजकिशोर यादव (वय १९, गायकवाडवाडी रोड, सिद्धिविनायक पार्कशेजारी, वडकी, दोघेही मूळ रा. मोहनपूर, बिहार ), अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडकी (ता. हवेली) येथे सोनवणे यांचे गायी व म्हशीच्या गोठ्याच्या ठिकाणी बेकायदेशीर अमली पदार्थ विक्री चालते, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष काळे यांना एका खबऱ्याकडून मिळाली.
लोणी काळभोर पोलिस पथक मागील आठ दिवसांपासून सापळा रचून संशयितांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होते. गायकवाडवाडी रोड वडकी हद्दीत दोन इसम हातामधील पिशवीमधील गांजा विकत असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. मिळालेली माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारी (दि.२२) रात्री सव्वासात वाजेच्या सुमारास दोन इसम सोनवणे यांच्या गायी-म्हशीच्या गोठ्याजवळ पोलिस पथकाने दोघांचा शिताफीने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांना नाव व पत्ता विचारले असता त्यांनी वरीलप्रमाणे नाव व पत्ता सांगितला. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचकडे पांढऱ्या रंगाचे पशू आहार खाद्याच्या पोत्यामध्ये हिरवट रंगाचा पाला (गांजा) खाकी रंगाच्या चिकटपट्टीने गुंडाळलेले असे तीन बंडल, एका लाल व निळ्या रंगाच्या कॅरिबॅगमध्ये सुटा गांजा, असा १ लाख ४० हजार रुपयांचा एकूण १० किलो गांजा जप्त केला. तपास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष काळे करीत आहेत.
सदरची कामगिरी शहर पोलिस आयुक्त रितेशकुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उप-आयुक्त सो परिमंडळ-५ विक्रांत देशमुख, हडपसर विभाग सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष काळे तपास पथकातील अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलिस अंमलदार नितीन गायकवाड, बोरावके, साळुंखे, जाधव, नागलोत, देवीकर, पवार, शिरगिरे, कुदळे, वीर, ढमढेरे, विश्रांती फणसे यांच्या पथकाने केला.