लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भाविकांच्या मनावर कोरोनाचे दाटलेले मळभ काहीसे दूर होऊन आसमंतात ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषाने जणू नवचैतन्य संचारले. कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी ‘विघ्नहर्ता’चे आगमन झाल्याने त्याच्या स्वागतासाठी अवघी पुण्यनगरी आनंदात न्हाऊन निघाली. सनईचौघड्याचे मंगलमयी सूर...रांगोळ्यांच्या पायघड्या अन वरूणराजाच्या अभिषेकाने ‘श्रीगणेशा’चे उत्साहात जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एरव्ही ढोलताशांच्या गजरात मिरवणुका काढून विराजमान होणाऱ्या शहरातील मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख मंडळाच्या ‘श्रीं’ची शुक्रवारी (दि.१०)मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. ‘कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होऊ दे आणि सृष्टीमध्ये पुन्हा सर्जनशीलतेची नवपालवी फुटू दे, असे साकडे भाविकांनी लाडक्या गणरायाला घातले. भाविकांना गणरायाचे घरबसल्या दर्शन घेता यावे यासाठी सर्व गणेश मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
----------------------------
कसबा गणपती
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना खासदार गिरीश बापट व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी झाली. दरवर्षी पारंपरिक वाद्यांच्या निनादात विराजमान होणारी ’श्रीं’ची मूर्ती यंदा मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परंपरेप्रमाणे पालखीतून उत्सव मंडपात आणण्यात आली. मंडळाच्या फेसबुक पेजवर लाईव्ह दर्शन घेण्याची व्यवस्था मंडळाकडून केली होती.
ऑनलाइन दर्शनासाठी -https://www.facebook.com/ShriKasbaGanpati/
----------------------------------
तांबडी जोगेश्वरी गणपती :
मानाचा दुसरा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरी गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ’श्रीं’ च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना वेदभवनचे प्राचार्य वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी झाली. मूर्ती मंडपात आल्याने बालिकांच्या हस्ते ‘श्रीं’चे औक्षण करण्यात आले. सनई-चौघड्याच्या मंगलमयी सुरावटीमधून ‘श्री’ची मूर्ती विराजमान झाली.
ऑनलाईन दर्शनासाठी -https://youtube.com/ShreeTambadiJogeshwariGaneshotsavMandal
---------------------------------
गुरुजी तालीम गणपती :
पुण्यातील मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम गणपतीचे यंदा १३५ वे वर्ष आहे. १८८७ साली या मंडळाची स्थापन झाली आहे. गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते दुपारी एक वाजता झाली. यंदा साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात येणार असल्याने सामाजिक उपक्रमांवर अधिक भर देण्यात येणार आहे. यावेळी स्थिर पद्धतीने ढोलवादन करण्यात आले.
ऑनलाइन दर्शनसाठी -https://www.facebook.com/profile.php?id=100050124661425
-------------------------------------
तुळशी बाग गणपती :
श्री तुळशी बाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना उद्योजक युवराज ढमाले यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी करण्यात आली. मंदिराभोवती घंटी महालाची आकर्षण सजावट सरपाले बंधूनी साकारली आहे. गणेश याग मंत्रजागर अशा धार्मिक विधींसह बाप्पांचे स्वागत करण्यात आले आहे. स्थिर पद्धतीने ढोलवादन करून ‘श्रीं’चे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
ऑनलाइन दर्शनासाठी -https://www.facebook.com/TulshibaugMahaGanpati/
---------------------------
केसरीवाडा गणपती :
मानाच्या पाचवा गणपती म्हणून नावलौकिक असलेल्या केसरीवाडा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने परंपरेनुसार पालखीतून ’श्रीं’ची मूर्ती केसरीवाड्यात आणण्यात आली आली. केसरीचे विश्वस्त रोहित टिळक व त्यांच्या पत्नी प्रणिती टिळक यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना झाली. सनई चौघड्याच्या मंगलमय वातावरणात सर्व धार्मिक विधी करण्यात आले.
ऑनलाइन दर्शनसाठी -https://m.youtube.com/c/KESARINEWSPAPER
------------------------------------------------------------ -------