मुंबई - चौसष्ठ कलांचा अधिपती बाप्पाचे आगमन सर्वत्र झाले असून त्याच्या स्वागतासाठी भाविक आपल्या कल्पनांमधून नानाविध देखावे साकारतात. मराठीतील अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे यांच्या पुण्यात आत्येभावाकडे चक्क एटीएम मशीनमध्ये बाप्पा विराजमानच झाले नाहीत तर आपल्या लाडक्या भक्ताला हा बाप्पा मशीनद्वारे कार्ड इन्सर्ट केल्यानंतर प्रसाद देखील देतो.
सुबोध भावे यांचा आत्येभाऊ संजय कुलकर्णी यांच्या राहत्या घरी संजय यांनी एटीएम मशीन साकारत त्यात लाडक्या गणपती बाप्पाला विराजमान केले आहे. अशी अनोखी नेत्रदीपक सजावट साकारून भाविकांना गणराया त्यांच्या कलेला वाव देत असतो. त्याचप्रमाणे संजय यांनी त्यांच्या कुशल कल्पनेने एटीएम मशीन साकारून तंत्रज्ञानाचा वापर करून कार्ड इन्सर्ट केल्यानंतर आपोआप मोदकाचा प्रसाद मिळतो. या एटीएमचा फुलफॉर्म ऍनि टाईम मोदक असा आहे. याबाबत ट्विटर आणि फेसबुकवर सुबोधने माहिती शेअर करत आपल्या भावाचे कौतुक केले आहे.