कपिल:- बाप्पा का रागावला आहे? हे बघ, आमच्या मंडळाने लाखो रुपये खर्चून तुझ्यासाठी हा देखावा केला आहे. तुझे आसन तर बघ हिऱ्या-माणकांचे!
बाप्पा:- कोणी सांगितला होता एवढा खर्च करायला? मनात नाही भाव अन् देवा मला पाव. देव भक्तीचा भुकेला आहे, हे माहीत नाही वाटतं तुम्हाला? एवढ्या पैशांची गरजूंना मदत झाली असती, तर किती आशीर्वाद मिळाले असते तुम्हाला. पण तुम्हाला काय हो लोकांचे, त्यांचे काहीही होवो, आपण आपले मजा करायला गणपतीत नाचायला मोकळे.
ध्रुव :- बाप्पा, आम्ही काय फक्त नाचतोच का? आपल्या स्वागतासाठी ढोल-ताशांचा कसून सराव करतो.
समृद्धी:- हो.. हो.. यात आता मुलीही मागे नाहीत.
वरद:- बाप्पा, तुझ्या भक्तांनी तुझ्यासाठी किती नारळ, फुले, सोन्या - मोत्याचे दागिने, तुझ्या आवडत्या दुर्वा, कित्येक झाडांची पत्री आणली आहे.
बाप्पा:- अरे..रे.. हे नको आहे मला. गाईला दुर्वा द्या आणि हो, एक झाड लावत नाही तुम्ही, उलट माझ्या नावाखाली झाडांच्या कोवळ्या फांद्या तोडता. पत्रीसाठी पर्यावरणाला कात्री अन् उजाड करता धरित्री.पटतच नाही हे मला.
सृष्टी :- देवाचं बरोबर आहे. आपण पर्यावरण रक्षणाचं भान ठेवलं पाहिजे.
कपिल :- बाप्पा, तू शेजारच्या मंडळात जाणार आणि आमच्या मंडळात यायला रागावलेला का आहेस? का नाही म्हणतोस ?
बाप्पा :- काय म्हणालात? आणखी एक मंडळ, कशाला हवीत हाताच्या अंतरावर मंडळ? ’एक गाव- एक गणपती' होऊ शकत नाही का? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा देखावा पाहून तर मला यावेळेस वाटत नाही. अरे..रे किती हा प्लास्टिक, थर्माकोलचा वापर. पर्यावरणाला मारक असणाऱ्र्या मखरात मी बसायचं! शक्यच नाही!
सर्व जण :- पण बाप्पा, आम्ही हे तुझ्यासाठीच केलं ना.
बाप्पा :- हो केलं ना, अडाण्यासारखं! मला खूप वाईट वाटतंय, मला बुद्धिदाता म्हणतात; पण माझे भक्तगण असे निर्बुद्धासारखे का वागतात? स्वेच्छेने दात्याकडून वर्गणी घेणारी, पर्यावरणपूरक, समाजप्रबोधक देखावे सादर करणारी मंडळं, यांचे खरंच खूप कौतुक वाटतं. दिवस-रात्र माझ्या भक्तांच्या रक्षणार्थ खडा पहारा देणाऱ्या पोलीसबांधवांचेही मी मनापासून कौतुक करतो.
ध्रुव :- बाप्पा, आमच्या मंडळाने पण मागील वर्षी ‘हुंडा: एक अनिष्ट प्रथा' ‘मुलगी वाचवा' ‘पृथ्वी वाचवा' असे देखावे सादर केले .
बाप्पा:- मग यावर्षी का प्लास्टिक, थर्माकोलचा वापर केला?
सर्वजण:- सर्वत्र तेच फॅड आहे ना…!
बाप्पा:- अरे..लोकमान्य टिळकांनी शिवजयंती व गणेशोत्सव सुरू केले कशासाठी आणि आता काय चाललं आहे? सगळीकडे जल प्रदूषण, भूमी प्रदूषण ,वायू प्रदूषण ,ध्वनी प्रदूषण आणि वाहतूककोंडी.
वरद:- हो! बाप्पाला तर अगदी शांतता लागते. आपल्या ध्वनिक्षेपकाचा आवाज केवढा असतो. आवाजामुळे एखाद्याच्या काळजाचा ठोका चुकला, तो आपल्या जिवाला मुकला, तर पाप आपल्यालाच लागेल ना.
सर्वजण:- अरे बापरे!
समृद्धी:- पर्यावरणवादी शाडूमातीची मूर्ती घ्या, असं सांगतात; पण आपण प्लास्टर ऑफ पॅरिसची, रासायनिक रंगांची मूर्ती आणतो. त्यामुळे जलप्रदूषण हे होणारच. शिवाय या मूर्ती पाण्यात विरघळतही नाहीत लवकर.
सृष्टी :- अगं, तुझं बरोबर आहे. आपण बाप्पाची मूर्ती शाडूमातीची आणू व कार्यकर्त्यांशी चर्चा करून ‘एक गाव- एक गणपती' करण्याचा प्रयत्नही करु.
कपिल:- अनेक दहीहंडी मंडळांनी आपली जमलेली वर्गणी स्वयंसेवी संस्थांना, पूरग्रस्तांना व कोरोनाग्रस्तांना दिली. आपणही हे करूया. बाप्पाने आपले डोळे उघडले. आपण भानावर यायला हवं. अजूनही वेळ गेली नाही, कारण जनसेवा हीच ईश्वरसेवा होय, त्यांचं दुःख ते आपलं दुःख!
सर्वजण:- बाप्पा तू म्हणशील तसं, अगदी तुझ्या मनासारखं, प्रदूषणरहित…तुझ्यासाठी काही पण.. आता तरी चल.. (बाप्पा होकारार्थी मान हलवून, छान हसून यायला तयार होतो..)
‘गणपती आला.. बाप्पा आला' म्हणून कपिल स्वप्नातून जागा होतो.
आणि बाप्पाकडे प्रार्थना करतो -
कोरोनाचे संकट जाऊ दे,
बाप्पा तुला डोळे भरून पाहू दे!
---------------------
प्रेमला अरुण शिंदे- बराटे