लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेच्या घनकचरा विभागाने गणेश विसर्जनासाठी सव्वा कोटी रुपये खर्चून ६० मिनी ट्रक व फिरते हौद अकरा दिवसांसाठी भाड्याने घेतले आहेत. परंतु, गणेशोत्सव दहा दिवसांचा असताना अकरा दिवसांचे भाडे का दिले जात आहे, असा प्रश्न उपस्थित करीत सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना मंचाने निवेदन दिले आहे. “यंदा मिरवणुकांना परवानगी नसल्याने विसर्जन अनंत चतुर्दशीला म्हणजे दहाव्या दिवशी पूर्ण होणार आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीला कोणत्याच गणपतीचे विसर्जन होत नसल्याने, त्या दिवशीचे पैसे वायाच जाणार आहेत. यातून पहिल्या व अकराव्या दिवसाचे मिळून तेवीस लाख रुपये कंत्राटदाराला नाहक दिले जाणार आहेत. दरम्यान, पुणेकरांना गेली अनेक वर्षे ठरावीक जागी ठेवल्या जाणाऱ्या हौदात गणेश विसर्जनाची सवय झाली आहे. मग हे फिरते हौद घेऊन विनाकारण पैशांचा अपव्यय कशासाठी,” असे या निवेदनात म्हटले आहे.
गेल्या वर्षी नागरिकांना संचारबंदीचे पालन करावे लागत असल्याने फिरत्या विसर्जन हौदांची संकल्पना ठीक होती; पण यंदा तसे काही नसल्याने फिरत्या हौदांची गरज काय? गेल्या वर्षी ३० फिरते हौद भाड्याने घेतले होते आणि ते पुरलेही होते. असे असताना यंदा साठ फिरते हौद घेण्यात आले. जास्तीत जास्त गणपतीमूर्तींचे विसर्जन दुसऱ्या, पाचव्या, सातव्या व दहाव्या दिवशी होत असल्याने उर्वरित सात दिवस दहा-बारा फिरते हौद पुरेसे झाले असते. तरीही सर्व दिवस साठ हौदांचा अट्टाहास करण्यात आला असून, त्यासाठी लाखो रुपयांचा विनाकारण भुर्दंड महापालिकेला पडला. महापालिकेचे हे कंत्राट म्हणजे पुणेकरांच्या सेवेऐवजी कंत्राटदाराच्या फायद्यासाठी काढण्यात आल्याचा आरोपही वेलणकर यांनी केला आहे.