पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत पहाटे ६ वाजल्यानंतर डि जे लावून देण्यास देण्यात आलेला नकार तसेच लवकर मिरवणुक काढून देण्यास दिलेला नकार, याबरोबरच खर्चात कपात करण्यासाठी अनेक मंडळे मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाली नाही़ लक्ष्मी रोडवरील मुख्य मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी २९० मंडळांनी पोलीस पास घेतला असताना केवळ १५५ मंडळे यंदा मिरवणुकीत सहभागी झाली. शेवटचा गणपती सकाळी पावणेदहा वाजता अलका टॉकीज चौकात आला होता. यंदा सर्वात कमी वेळेत विसर्जन मिरवणुक संपण्याची शक्यता आहे.
बेलबाग चौकातून टिंबर मार्केट येथील जनविकास मंडळाचा शेवटचा गणपती सकाळी ८.३० वाजता लक्ष्मी रोडवरील मिरवणुकीत सहभागी झाला. तर टिळक रोडवरील विसर्जन मिरवणुकीत १२८ गणेश मंडळे सहभागी झाली. टिळक रोडवरील स प महाविद्यालय चौकातून सकाळी ९ वाजता अमर ज्योती मंडळाचा शेवटचा गणपती विसर्जनासाठी पुढे मार्गस्थ झाला़
सांगली, कोल्हापूर येथीज पूरग्रस्तांना अनेक मंडळांनी मदत केली आहे़ तसेच यंदा अनेक मंडळांकडे वर्गणी कमी जमा झाली़ त्याच वेळी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यावरुन पोलिसांनी टाकलेल्या अटी अनेकांना जाचक वाटत होत्या़ तसेच काही मंडळांनी सकाळी लवकर मिरवणुक काढण्याची विनंती केली होती़ पण त्यांची मागणी फेटाळण्यात आली़ पहाटे ६ वाजल्यानंतर मंडळांना डि जे लावण्यास परवानगी दिली जाते़ पण यंदा पोलिसांनी सकाळी ६ वाजल्यानंतर डि जे लावू दिला नाही़ त्यामुळे अनेक मंडळे मिरवणुकीत सहभागी न होता माघारी निघून गेल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. अनेकांनी पोलिसांच्या स्वागत कक्षातील स्वागतही स्विकारले नसल्याचे कार्यकर्तें म्हणाले.
लक्ष्मी रोडवरील मुख्य मिरवणुकीत सहभागी होण्याचा बहुतांश मंडळांचा प्रयत्न असतो़ पण यंदा आजवरच्या सर्वात कमी मंडळे या लक्ष्मी रोडवरील मिरवणुकीत सहभागी झाली होती.