पुणे:- गायन, वादन व नृत्य या संगीतातील तिन्ही शाखातील नवोदित व प्रथितयश कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारे 'गानवर्धन' संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष कृष्णा गोपाळ उपाख्य उर्फ कृ. गो. धर्माधिकारी (वय 86) यांचे सोमवारी कोरोनामुळे निधन झाले.
कोरोनातून निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांची तब्येत अधिक खालावली. खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्याची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी कुमुद, पुत्र सुधीर, कन्या सविता हर्षे आणि जावई डॉ. भास्कर हर्षे असा परिवार आहे. पुण्यातील संगीत क्षेत्रात धर्माधिकारी यांचे महत्वपूर्ण योगदान होतेच, पण त्याचबरोबर ते एका औषध निर्माण कंपनीत शेवटपर्यंत संचालक म्हणून कार्यरत होते.
धर्माधिकारी यांनी 1978 साली ‘गानवर्धन’ ची स्थापना केली. गेली 43 वर्षे हा संगीत यज्ञ अखंडपणे सुरू आहे. संस्थेने आतापर्यंत 1000 हून अधिक कलाकारांना जाणकार रसिकांसमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. याशिवाय संगीत शिबिरे, शास्त्रीय संगीताच्या विशिष्ठ विषयांची प्रयोजने, गायन, वादन, नृत्य स्पर्धा दरवर्षी संगीत विचारवंतांच्या सहभागाने चर्चासत्र, सुग्रास संगीतोत्सव ,निवासी स्वरमंच, नामवंत गायकांची स्वानुभवी सप्रयोग व्याख्याने असे अनेक अभिनव व शैक्षणिक उपक्रमही संस्थेने आयोजित केले आहेत .
स्वरयोगिनी डॉ.प्रभा अत्रे पुरस्कार, कै. अप्पासाहेब जळगावकर संवादिनी वादन पुरस्कार, कै.पं.जानोरीकर, नृत्यांगना कै.रोहिणी भाटे, कै.डॉ. श्रीरंग संगोराम, कै.पं.शरद सुतवणे अशा नामवंत कलावंत व संगीत अभ्यासकांच्या नावाने मान्यवर तसेच नवोदित संगीत साधकांना संस्थेतर्फे पुरस्कारही दिले जातात. संगीत विषयांचे विविध अंगाने विवरण व्हावे व नवकलाकार, जाणकार व श्रोत्यांच्या शंकाचे निरसन व्हावे याकरिता संस्था १९८२ पासून दरवर्षी ‘मुक्त संगीत चर्चासत्र’ हे ज्ञानसत्र साकारले जात आहे. त्यात अखिल भारतीय कीर्तीच्या अनेक संगीत तज्ञांनी मुक्त सहभाग दिला आहे. या चर्चासत्रावर आधारित 'मुक्त संगीत संवाद' हे मराठी, हिंदी व इंग्रजीमधील तीन ग्रंथ प्रकाशन त्यांचे महत्वाचे सांगितिक कार्य होते.
संगीत अलंकार ते डॉक्टरेट पर्यंतच्या अभ्यासासाठी एक संदर्भग्रंथ म्हणून वापरला जातो. संस्थेला भारतीय अभिजात संगीत विश्वातील महान साधकांचे आशीर्वाद लाभले. प्रसिद्ध गायिका डॉ.प्रभा अत्रे संस्थेच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षा असून, उस्ताद उस्मान खान, नृत्यांगना सुचेता चापेकर, पं.अतुल उपाध्ये हे मान्यवर समितीत आहेत.