गावं तिथे एसटी, पण धावते केवळ शहरासाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य परिवहन महामंडळाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पूर्ण क्षमतेने प्रवासी सेवा सुरू केली. यात लाल परी, शिवशाही, शिवनेरी, रातराणी, आदी गाड्यांचा समावेश आहे. मात्र ग्रामीण महाराष्ट्रची ‘लाईफलाईन’ समजली जाणारी एसटी अद्यापही ग्रामीण भागापासून कोसो दूर आहे. ग्रामीण भागातील एसटी सेवा बंद असल्याने अनेक प्रवासी टमटम, वडापने प्रवास करीत आहे.
पुणे जिल्ह्यात एसटीची प्रवासी सेवा सुरू झाली असली तरीही अद्यापही पन्नास टक्के एसटी गाड्या आगारातच थांबून आहेत. ग्रामीण भागात प्रवाशांचा कमी प्रतिसाद असल्याने ग्रामीण भागातली एसटी सेवा प्रभावित झाली असल्याचे एसटी प्रशासनाचे म्हणणे आहे. दुसरीकडे गावात एसटी येत नसल्याने वडाप, टमटमचा व्यवसाय जोरात सुरू आहे.
बॉक्स १
पुणे विभागात एकूण बसेस : एक हजार
सध्या सुरू असलेले बसेस : ५१८
आगारात उभ्या असलेल्या बसेस : ४८२
बॉक्स २
खेडेगावात जाण्यासाठी वडापचा आधार :
पुणे विभागात स्वारगेट, वाकडेवाडी, इंदापूर, आदी प्रमुख आगार अन्य आगराच्या बहुतांश बसेस आगारात थांबून आहे. विशेषतः ग्रामीण भागात वाहतूक करणाऱ्या सासवड, शिरूर व दौंड आगाराच्या गाड्या आपल्या मुक्कामी जाणाऱ्या एसटी सेवा अद्याप सुरू केलीच नाही. मुक्कामी एसटी नसल्याने खेड्यापाड्यात एसटी सेवा नाही. त्यामुळेच प्रवासी खासगी वाहनांनी प्रवास करीत आहेत.
बॉक्स ३
एसटीचा किती झाला प्रवास?
पुणे विभागातल्या एसटी गाड्यांनी गेल्या सुमारे अडीच महिन्यांत जवळपास २ लाख १२ हजार किमीचा प्रवास केला आहे. पुणे विभागाला रोजचे ५८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. कोरोनापूर्वी पुणे विभागाचे एक ते दीड कोटी रुपये उत्पन्न होते.
कोट :
“ग्रामीण भागातील एसटी गाड्यांना अजूनही अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे तोट्यात असणाऱ्या गाड्या बंद केल्या आहेत.”
-ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, पुणे.