किरण शिंदे
पुणे : दोन मर्सिडीज दिल्यानंतर शिवसेनेत पद मिळायचं असं विधान शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलं होतं. आणि त्यानंतर नीलम गोरे यांच्या विरोधात राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले होते. मात्र त्याची सुरुवात पुणे शहरापासून झाली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर आक्रमक आंदोलन केले होते. या महिलांनी नीलम गोऱ्हे यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या या आंदोलनातून शिवसेना कशी होती याचा प्रत्यय आला होता. तब्बल तासभर चाललेल्या या आंदोलनाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली होती. मात्र या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलाच आता शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. आणि त्याला कारण ठरलंय मातोश्रीवर झालेला अपमान.
पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी केलेलं आक्रमक आंदोलन पाहून शिवसेना पमुख उद्धव ठाकरे यांनी महिला आघाडीचे कौतुक केले. इतकेच नाही तर या सर्व महिलांना मातोश्रीवर बोलावून त्यांच्याशी संवादही साधला. यातील काही महिलांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधताना आम्ही आंदोलन करतो, भाजप शिवसेनेच्या नेत्यांना अंगावर घेतो. मात्र पद देण्याची वेळ येते तेव्हा आम्हाला दूर ठेवले जाते अशी खंत बोलून दाखवली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही आंदोलन छान झाले, मात्र आंदोलन करताना स्वतःची काळजी घ्या. शिवसेनेशी एकनिष्ठ राहणाऱ्या महिलांचा भविष्यात नक्की विचार केला जाईल असे आश्वासन या महिलाना दिले. मात्र उद्धव ठाकरे जाताच या महिलांच्या वाट्याला अपमान आला.
त्यानंतर उद्धव ठाकरे या महिलांना भेटून गेल्यानंतर मातोश्रीवरच वादाची ठिणगी पडली असल्याची माहिती आता समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या समोरच शिवसेनेतील पद वाटपाचा मुद्दा काढल्यामुळे शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत चांगल्याच संतप्त झाल्या असल्याची ही माहिती आहे. कारण महिला आघाडीतील पद वाटपाची जबाबदारी विशाखा राऊत यांच्याकडे आहे. त्यामुळे विशाखा राऊत यांनी पुण्यातून आलेल्या या महिलांचा अपमान केला. इतकंच नाही तर तुम्हाला पद कसे मिळते तेच बघते. कुठल्या कोपऱ्यात पडून राहाल ते कळणारही नाही अशा शब्दात या महिलांचा अपमान केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या सर्व घडामोडीनंतर पुण्यातून मातोश्रीवर गेलेल्या या महिलांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कौतुक केले, पाठीवर शाबासकीची थापही दिली. मात्र उद्धव ठाकरे निघून जातात या महिलांच्या वाट्याला अवहेलना आली. त्यामुळे संतप्त झालेल्या या महिला बाहेर पडल्या. आणि आता शिवसेनेतील या महिलांनी शिंदे गटात जाण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती यातील काही महिलांनी लोकमतशी बोलताना दिली.