आळेफाटा (पुणे) : जीप गाडी दुरुस्तीसाठी ठरलेल्या व्यवहारातील पैशांवरून झालेल्या वादात टुरिस्ट व्यावसायिकाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना आळेफाटा परिसरात मंगळवारी (दि.२४) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे खून केल्यानंतर गॅरेज कामगारानेही स्वतःवर वार करून घेतले.
विनायक उर्फ संतोष बबन गोडसे (वय ४२, रा. पिंपळवंडी) असे खून झालेल्या टुरिस्ट व्यावसायिकाचे नाव आहे. तर मयूर अशोक सोमवंशी (रा. आळेफाटा) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी (दि.२४) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आळेफाटा पुणे-नाशिक महामार्गावर हैदरभाई यांचे गॅरेजच्या समोर मयूर सोमवंशी यांनी विनायक उर्फ संतोष गोडसे यास त्याने त्यांची मालकीची गाडीच्या (क्र. एमएच १४ डीटी ५३०८) दुरुस्तीसाठी ठरलेल्या व्यवहारातील राहिलेले ५०० रुपये का देत नाहीस असे म्हणून फोनवर त्रास देऊन शिवीगाळ व दमदाटी करून त्यास तू हैदरभाई यांच्या गॅरेज समोर ये असे म्हणाला.
यानंतर आळेफाटा चौकातून विनायक उर्फ संतोष गोडसे तेथे गेले असता दोघांमध्ये वाद झाला. यातून आरोपी मयूर सोमवंशी याने संतोष गोडसे यांच्या छातीवर हातातील चाकूने वार केले. या घटनेत ते गंभीर जखमी होऊन ठार झाले. याबाबत सचिन जाधव यांनी फिर्याद दिली. घटनेनंतर मयूर सोमवंशी यानेही स्वतःवर वार करून घेतले. त्याला उपचारासाठी आळेफाटा येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. आळेफाटा पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी मयूर सोमवंशी याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे पुढील तपास करत आहेत.