आळंदीत शहराच्या पश्चिमेला इंद्रायणी नदीलगत लिंगायत व मुस्लिम समाजाची दफनभुमी आहे. सध्या मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा असून कुठल्याही प्रकारची सोयीसुविधा कार्यान्वित करण्यात आलेल्या नाहीत. दफनभूमी परिसराकडे जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. त्या ठिकाणी पथदिवे नाही. तसेच पाण्याची कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे विधी करताना मोठ्या अडचणींचा सामना संबंधितांना करावा लागत आहे.
यासंदर्भात आळंदी नगर परिषदेकडे लिंगायत समाजाने अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. मात्र नगरपरिषदेने या प्रश्नांची कुठल्या प्रकारची दखल घेतली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. आमच्या प्रश्नासंदर्भात नगरपरिषदेने तत्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर आम्हाला आमच्या हक्कासाठी एकत्रित आंदोलन करावे लागेल, असा इशारा लिंगायत समाज, धर्मरक्षक प्रतिष्ठान व अविरत फाऊंडेशनने दिला आहे.
२४ आळंदी कचरा
आळंदी येथे दफनभूमीत खड्डा खोदताना निघणारा कचरा.